विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : शरद पवार व अजित पवार यांच्यात राजकीय फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती. आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे.
काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मध्ये शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यानंतर कन्हेरी येथे पार पडलेल्या सभेमध्ये बोलताना अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभेला मी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन मोठी चूक केली. परंतु आता कोणी चूक केली?
पहिल्यांदा फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सर्व तात्यासाहेबांचे कुटुंब. बिकट परिस्थिती मधून आम्ही परिस्थिती चांगली केली. आईने सांगितले होते, माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. फॉर्म कोणी भरायला सांगितला? असे विचारले, तर साहेबांनी फॉर्म भरायला लावला म्हणालेत. म्हणजे साहेबांनी तात्यासाहेबांचे कुटुंब फोडले का?
आम्ही जीवाला जीव देणारी माणसे आहोत. एकोपा टिकवायला पिढ्यान पिढ्या जातात. परंतु तो तोडायला वेळ लागत नाही, अस सांगताच भर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर अजित पवार यांनी आपले भाषण थांबवले. व कार्यकर्त्यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, घरातील भांडण चार भिंतीच्या आत झाले पाहिजे. ते चव्हाट्यावर आणण्याची गरज नाही. एकदा दरी पडली किती साधायला दुसरं कोणी येऊ शकत नाही. असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत कुटुंबातील फुटीबाबत भाष्य केलं.











