बारामती, अहिल्यानगर : महान्यूज लाईव्ह
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रोहित पवार हे सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर ) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार देखील सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार रोहित पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. सोमवारी ते अर्ज दाखल करणार असून यावेळी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर हे उपस्थित राहणार आहेत. कर्जत जामखेड मधून रोहित पवार हे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात माजी मंत्री राम शिंदे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. विकास विरुद्ध विकासाची मारेकरी अशी स्लोगन घेऊन रोहित पवार या निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आमदार रोहित पवार हे उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी कर्जत येथील फाळके पेट्रोल पंपाशेजारील मैदानावर जाहीर सभेचे आय़ोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी अर्ज दाखल करणार असून त्यापूर्वी सकाळी ते रॅली काढणार आहेत.
संपूर्ण शहरातून ही रॅली निघणार असून त्यानंतर बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र कन्हेरी येथे त्यांची जाहीर सभा होऊन, त्या ठिकाणी प्रचाराची सुरुवात होणार आहे. दरम्यान युगेंद्र पवार देखील सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, मात्र त्या संदर्भातील अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. युगेंद्र पवार यांना महाविकास आघाडीच्या वतीने बारामतीत उमेदवारी देण्यात आली असून, बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्याची, परंतु आता थेट लढत होणार आहे. या लढतीकडे देखील राज्याचे लक्ष आहे.











