राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड. : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दौंड विधानसभेच्या दुसऱ्या यादी मध्येही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार आणि माजी आमदार रमेश थोरात यांची कालची मुंबई वारीही निष्फळ ठरली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या तीन चार तासांच्या बैठकीनंतर त्यांना निराश होऊन रिकाम्या हातानेच परतावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, शिरुर, जुन्नर, खडकवासला या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. मात्र दौंड विधानसभा मतदारसंघा बाबत अद्याप उमेदवार जाहीर केला गेला नाही. काल दुसऱ्या यादीत तरी दौंड विधानसभेची उमेदवारी जाहीर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, दौंडकरांची विशेषतः माजी आमदार रमेश थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा फोल ठरली.
शरद पवार यांनी रविवारी ( दि २६) दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार आणि माजी आमदार रमेश थोरात यांना मुंबई येथील निवासस्थानी तातडीने चर्चेसाठी बोलवले होते. त्यामुळे माजी आमदार थोरात आणि आप्पासाहेब पवार यांनी थेट मुंबई गाठली. शरद पवार यांच्याशी चर्चा होण्यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली.
मात्र या दुसऱ्या यादीत तरी दौंड विधानसभेचा उमेदवार जाहीर होईल अशी अपेक्षा होती. मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवून असलेल्या दौंड तालुक्यातील असंख्य राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांची निराशा झाली. माजी आमदार थोरात समर्थकांनी थोरात यांना तर आप्पासाहेब पवार समर्थकांनी आप्पासाहेब पवार यांना फोन फोन करुन विचारपूस करायला सुरुवात केली. मात्र अद्याप चर्चा झाली नाही, चर्चा सुरू होईल. थोड्याच वेळा निर्णय कळेल. थोडी कळ काढा असा निरोप दहा दहा पंधरा मिनिटाला येत होता.
मात्र शरद पवार यांनी रमेश थोरात आणि आप्पासाहेब पवार यांच्याशी दीड दोन तास चर्चा केली. मात्र नेमकी कोणाला उमेदवारी देणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले उद्या उमेदवारी जाहीर करू असे आश्वासन दोन्ही आप्पांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरी उमेदवारी यादी जाहीर करताना पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की , कदाचित तिसरी यादी जाहीर करता येणार नाही, थेट पक्षाचे एबी फार्म संबंधित उमेदवारांना दिले जातील असे जाहीर केले.
मात्र शरद पवारांच्या चर्चेनंतरही इच्छुक असलेल्या दोन्ही आप्पांनाही पक्षाचे एबी फार्म देण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दौंडची उमेदवारी नेमकी कोणाला हे आज ठरणार की उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला मुदत संपण्याच्या क्षणाला? हे मात्र त्यांच्याशिवाय कोणी सांगू शकणार नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रमेश थोरात यांची बारामती व पुणे येथे खासदार सुप्रिया सुळे आणि पक्ष श्रेष्ठींची पाच सहा वेळा चर्चा झाली आहे. रविवारी खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रमेश थोरात यांना चर्चेसाठी मुंबई ला बोलावले होते. मात्र बंद दाराआड झालेल्या चर्चेत काय निर्णय झाला हे समजू शकले नाही. रमेश थोरात आणि आप्पासाहेब पवार या दोघांनाही उद्या उमेदवारी जाहीर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दौंडची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे?
दरम्यान , आता यासंदर्भात रमेश थोरात हे अपक्ष लढणार की, राष्ट्रीय समाज पक्षाकडे उमेदवारी मागणार की, पुन्हा तुतारी चिन्ह मिळेल का? याची वाट बघणार ते आता नेमकी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष्य लागले आहे. पुणे जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जागा दिली नसल्याने कदाचित दौंडच्या जागेसंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये चर्चा सुरू असून दौंडची जागा ही ठाकरे गटाच्या शिवसेनेला ही जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.











