राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड विधानसभेसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राजाभाऊ तांबे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तांबे यांनी जरांगे पाटील यांची नुकतीच मुलाखत दिली आहे. त्यामुळे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या विरोधात पुन्हा एकदा राजाभाऊ तांबे मैदानात उतरणार आहेत.
भारतीय जनता पक्षाने पहिल्याच यादीत दौंड विधानसभेसाठी आमदार राहुल कुल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार मिळेना, परिणामी माजी आमदार रमेश थोरात हे अद्याप तळ्यात मळ्यातच आहेत. अशातच सन 2014 ला मनसेकडून रिंगणात उतरलेले राजाभाऊ तांबे हे पुन्हा एकदा 2024 ला मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत.
तांबे यांनी काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. तर दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी तांबे यांची मुलाखत घेतली आहे. या संदर्भात जरांगे पाटील यांनी अधिकृत घोषणा जरी केली नसली, तरी त्यांच्या उमेदवाराला त्यांनी हिरवा कंदिल दाखवल्याची चर्चा आहे. त्यामुळे तांबे यांनी मागील काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील गाव आणि वाड्यावस्त्यांवर मतदारांशी गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
मराठा आरक्षण समर्थकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा तांबे करीत आहेत. 2014 ला राजाभाऊ तांबे यांना मनसेने उमेदवारी दिली होती. राजाभाऊ तांबे यांना 17 हजार 98 मते मिळाली होती. तांबे यांच्यामुळे माजी आमदार रमेश थोरात यांना पराभवाचा फटका बसला होता तर आमदार राहुल कुल हे ११ हजार ३७५ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. तांबे हे पुन्हा एकदा कुल – थोरात यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तसे झाल्यास 2024 मध्येही 2014 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, फक्त याचा फटका थोरात यांना बसणार की कुलांना हे पहावे लागणार.











