बारामती : महान्यूज लाईव्ह
इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापुरात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख संजय सोनवणे यांनी अजित पवारांच्या पक्षाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्या संदर्भात अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अजित पवारांना बारामतीच्या निवडणुकीवरून प्रश्न विचारला होता.
बारामतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पवार कुटुंबातच सामना रंगताना दिसत आहे, कारण अजित पवारांच्या पक्षाने अजित पवारांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील युगेंद्र पवार यांना आज एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर केली आहे. आता बारामतीत देखील दोन पवारांमध्येच ही लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून आता ही राज्याची व देशाची चर्चेची निवडणूक ठरणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत जरी सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या पक्षाकडून आणि सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पक्षाकडून उभे होत्या, तरी देखील ही निवडणूक अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच रंगवली गेली. आता देखील विधानसभेची लढत ही अजित पवारांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार यांच्यासोबत होणार असली, तरी देखील या निवडणुकीला किनार आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याच लढतीची! एकूणच विधानसभेला देखील शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होतो का हे पाहणे महत्त्वाचे असेल.
मात्र आज बारामतीत या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी सांगितले की, निवडणुकीमध्ये हे सगळं चालतं. उद्या तुम्ही देखील फॉर्म भरू शकता, पण बारामतीकर सुज्ञ आहेत. याचा मला विश्वास आहे. २३ तारखेला मतमोजणी होऊ द्या, तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल. मी महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे.
मी सात वेळा निवडणूक लढली. मला बारामतीकरांनी साथ दिली. बारामतीकर हे माझं घर आहे. माझं कुटुंब आहे. मी माझी भूमिका त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल, अर्थात महाराष्ट्रात फिरताना मी ताठ मानेने फिरेल असाच निकाल बारामतीकर देतील हा मला विश्वास आहे.
पत्रकाराने विचारलं.. काका विरुद्ध पुतण्याच्या लढतीकडे कसे पाहता? अजित पवार म्हणाले, तु जसे पाहतो, तसेच मी पाहतो आणि त्यानंतर उपस्थित पत्रकारांमध्ये देखील हशा पिकला.











