जळगाव : महान्यूज लाईव्ह
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे पोलिसांनी दीड कोटी रुपयांची रोकड जप्त केली. विधानसभेच्या तोंडावर जप्त केलेल्या या रोकड रकमेनंतर रोहित पवारांनी मात्र राज्य सरकारवर मोठा निशाणा साधला आहे. राज्यात सत्ताधारी पक्षाकडून दलालीच्या पैशांची त्सुनामी येणार असून त्यापूर्वी दलालीच्या पैशाच्या लाटा धडकायला सुरुवात झाली आहे अशा शब्दात रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे मंगळवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार लावलेल्या नाकाबंदीमध्ये एक वाहन सापडले. या वाहनांमध्ये अंदाजे दीड कोटी रुपये होते असे सांगितले जात होते. रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती रक्कम त्या परिसरातील जिनिंग मिल व्यवसायिकाची असून शेतकऱ्यांकडून खरेदी करत असलेल्या कापसाच्या मोबदल्यासाठी ही रक्कम वाहनातून नेली जात होती. अशी माहिती कासोदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी दिली.
मात्र यानंतर आमदार रोहित पवार यांनी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील हा फोटो ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली. दलालीच्या पैशातून महाराष्ट्र विकत घेऊ पाहणाऱ्या दलाला दलालखोरांना जनता गाडल्याशिवाय राहणार नाही तसेच महाराष्ट्रात हे गुजरात मॉडेल आणि त्यांच्या नेत्यांचे मनसुबे शंभर टक्के उध्वस्त होतील असा विश्वास व्यक्त केला.
निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून दलालीच्या पैशांची सुनामी येणार असून त्यापूर्वी दलालीच्या पैशांच्या लाटा धडकायला सुरुवात झाली आहे. परवा काही लाटा खेड शिवापूरच्या झाडी डोंगरात धडकल्या, तर काल रात्री जळगावच्या एरंडोल मध्ये ही दलालीच्या पैशांच्या लाटा धडकल्या असून पोलिसांनी दीड कोटी जप्त केल्याची माहिती आहे अशा स्वरूपाची टीका रोहित पवार यांनी केली.











