कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो असे सांगत अनेक कंपन्या लोकांकडून गुंतवणूक करत आहेत आणि मोठी गुंतवणूक झाल्यानंतर त्या पसार होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही फॉरेस्ट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली राजेंद्र नेर्लीकर याने 45 दिवसात रक्कम दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवत 12 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यातील राजेंद्र भिमराव नेर्लीकर हा फरार झाला आहे. त्याचा मुलगा बालाजी राजेंद्र नेर्लीकर याला मात्र पोलिसांनी अटक केली आहे.
याची थोडक्यात माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील उत्तूर परिसरात राजेंद्र नेर्लीकर याने सन 2021 मध्ये फॉरेस्ट ट्रेडिंग कंपनी सुरू केली होती. या कंपनीत जे गुंतवणूक करतील त्यांना 45 दिवसात दाम दुप्पट रक्कम देऊ असे अमिष दाखवले. गुंतवलेली रक्कम तुमची सुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी त्याने स्वतःच्या बँक खात्याचे धनादेश देखील दिले. त्यामुळे अनेक गुंतवणूकदरांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्याकडे गुंतवणूक केली.
मात्र सुरुवातीला पैसे देणारा नेर्लीकर काही दिवसातच कंपनीचा गाशा गुंडाळून गेला. सप्टेंबर 2021 ते एप्रिल 2022 यादरम्यान या नेर्लीकर याच्या कंपनीत मोठ्या रकमेची गुंतवणूक झाली. ही गुंतवणूक तब्बल 13 लाखांच्या आसपास होती, मात्र काही दिवसानंतर गुंतवणूकदारांना परतावा मिळायचा बंद झाला. त्यामुळे हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी नेर्लीकर याचे दरवाजे ठोठावले. तेव्हा त्याने टाळाटाळ करत या गुंतवणूकदारांनाच तुम्ही अजून पैसे देणे लागता अशा प्रकारच्या नोटीस पाठवल्या.
त्यामुळे सेवानिवृत्त सैनिक विनायक राजाराम पाटील यांनी व इतर गुंतवणूकदारांनी अगोदर त्याच्या घरासमोर धरणे आंदोलन देखील केले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेल्या पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकड फिर्याद दिली. कोल्हापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने यामध्ये गुन्हा दाखल करत फसवणूक झालेल्या इतरांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांनी फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचे मत व्यक्त केले आहे.











