राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : भारतीय जनता पक्षाकडून आमदार राहुल कुल यांची उमेदवारी जाहीर झाली आणि ते प्रचारालाही लागले, मात्र त्यांच्या विरोधात लढणार कोण? हे मात्र ठरेना ? लोकसभेला 26 हजारांचे मताधिक्य घेणारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दौंड विधानसभेच्या निवडणुकीत मात्र कोणाला उमेदवारी द्यायची या विषयावर गंडलय का?
आता कोणाला उमेदवारी देणार याची घोषणा आज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार आणि माजी आमदार रमेश थोरात हे दोघेही प्रबळ दावेदार असल्याने यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत उत्सुकता लागली आहे. मात्र हे दोन्ही आप्पा सध्या गॅसवर आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज वाटप आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र दौंड मध्ये महायुतीने उमेदवार जाहीर केल्याने महायुतीकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांचे समर्थक विरधवल जगदाळेंनी दौंड च्या जागेवर दावा करुन उमेदवारी अर्ज घेतल्याने आमदार कुल यांचे टेन्शन वाढले आहे. तर महाविकास आघाडीकडून दौंडची जागा ही शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे.
इच्छुक उमेदवारांनी खासदार सुप्रिया सुळे व पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेऊन चर्चा केली आहे. मात्र यावर अद्याप तोडगा निघाला नाही. इच्छुकांना नादी लावून ठेवण्याची दौंडमध्ये पवारांची ही जुनीच खेळी असल्याचे चर्चा सुरू आहे. माजी आमदार रमेश थोरात यांनी महायुती अर्थात अजित पवार यांच्या गटातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, ते तुतारी किंवा अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
रमेश थोरात यांना शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र ते उमेदवारी जाहीर होण्याची वाट बघत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाच जण इच्छुक आहेत. यापैकी काहींनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी थोरात यांना पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे आप्पासाहेब पवार यांनाच उमेदवारी निश्चित झाल्याचा दावा आप्पासाहेब पवार समर्थक करीत आहेत.
आमदार कुल यांच्या समर्थकांनाही आप्पासाहेब पवार यांनाच उमेदवारी मिळायला हवी त्यासाठी ते छुप्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे समर्थन केले जात असल्याचे चित्र आहे. शरद पवारांच्या गटाकडून आप्पासाहेब पवार यांना उमेदवारी मिळाल्यास आमदार कुल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि कुल हे एकतर्फी विजयी होतील असा विश्वास कुल समर्थकांचा आहे. मात्र जर ही उमेदवारी थोरात यांना मिळाल्यास कुल यांना कडवे आव्हान निर्माण होऊ शकते, त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नेमकी कोणाला उमेदवारी जाहीर होणार याकडे भाजपसह सर्व राजकीय पक्ष व मतदारांचे लक्ष लागले आहे.











