कोट्यवधीचा विकास निधी आणलाय सदाभाऊंनी! अन् श्रेय लाटतात आमदार राहुल दादा! हे बरं नव्हं ! महायुतीतील रयत क्रांती संघटनेचा आमदार कुलांवर आरोप!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेपूर्वी भाजप आमदार राहुल कुल यांनी विविध कोट्यवधी विकास कामांचे उद्घाटन आणि भूमीपूजनाचे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पाडले, मात्र आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने आमदार कुल यांच्या या विकासकामांवर आक्षेप घेतला आहे.
कुल यांनी ज्या कामांचा निधी आणलाच नाही, त्या कामांचे ही ते क्षेय लाटत आहेत. असा गंभीर आरोप रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सर्फराज शेख यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यातील विधानसभा उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली आणि महायुतील घटक पक्षांनी कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र दौंड तालुक्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने मात्र भाजप आमदार राहुल कुलांना घरचा आहेर दिला आहे.
संघटनेचे तालुकाध्यक्ष सर्फराज शेख यांनी नुकतेच एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, आमदार कुल यांनी मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेल्या विकास कामांवर आक्षेप घेतला आहे. कुल यांनी जी कामे मंजूर केली नाहीत व कधी त्याचा पाठपुरावा सुद्धा केला नाही. अशी कामे केल्याचा फलक लावून ती मी केली आहेत, असे दाखवून ते तालुक्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. तालुक्यातील गार, नानविज, सोनवडी पाणी पुरवठा योजना मी स्वतः सदाभाऊ खोत यांच्याकडे पाठपुरावा करून २०१९ रोजी मंजुर करुन घेतली होती.
सदाभाऊ खोत यांनी त्यासाठी निधी उपलब्ध केल्याने या भागातील पाणी प्रश्न मार्गी लागला. तसेच कानगाव येथील मंदीरासाठी १० लाख व पारगाव येथील रस्त्यांसाठी २४ लाखांचा विकास निधी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उपलब्ध दिला आहे. सदाभाऊ खोत यांनी उपलब्ध केलेल्या विकासनिधीवर आमदार कुल हे श्रेय घेत आहेत. आमदार कुल यांनी केलेली कोट्यावधी विकास कामांचे फलक म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल आहे. असा आरोप शेख यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात केला आहे.











