बारामती : महान्यूज लाईव्ह
महायुतीत भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर करून पहिल्यांदा बाजी मारली. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरूच असून या चर्चेच्या फेऱ्यादरम्यान शरद पवार हे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मध्यस्थी करत आहेत. यादरम्यानच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारांची संभाव्य यादी चर्चेत आली असून, बारामतीत ज्याप्रमाणे अजित पवारांनी उमेदवारी अप्रत्यक्षरीत्या जाहीर केली आहे, तसेच बारामतीत विधानसभा निवडणुकीसाठी युगेंद्र पवारांची उमेदवारी देखील अप्रत्यक्षरीत्या जाहीर झाल्यात जमा आहे.
एकूणच बारामती लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच देशाला अनपेक्षित रित्या काकाविरुद्ध पुतण्याची लढाई पहावी लागली यात साठ वर्षाची राजकीय कारकीर्द असलेल्या शरद पवारांनी 35 वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या पुतण्याचा पराभव केला. त्याची शाई अजून वाळते न वाळते तोच विधानसभेच्या निवडणुका देखील तोंडावर आल्या आहेत आणि आता देखील बारामतीत पुन्हा एकदा काका आणि पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
यावेळी हा संघर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार असलेले युगेंद्र पवार यांच्यातच पाहायला मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आत्या सुप्रिया सुळे यांचा प्रचार केलेले युगेंद्र पवार आता गेल्या काही दिवसापासून सातत्याने जनसंवाद यात्रा, स्वाभिमान यात्रा, आभार दौरा या निमित्ताने बारामती तालुक्यातील नागरिकांशी भेटत आहेत. लोकसभेची निवडणूक पार पडताच योगेंद्र पवार यांच्या समर्थकांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांनाच विधानसभेची उमेदवारी द्या असे सांगत होते अर्थात गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार हे बारामती तालुक्यात फिरत असले तरी त्यांनी उमेदवारीचा ना इन्कार केला, ना उमेदवारीला दुजोरा दिला.
दुसरीकडे अजित पवार यांनी देखील मला राज्यभर फिरायचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आठ, नऊ निवडणुका लढवल्यानंतर विकास कामे करूनही आपल्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर निवडणुका लढायच्या कशाला? असे वक्तव्य करत राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे अजित पवार हे निवडणुकीला उभे राहणार का? असा प्रश्न सुरू झाला आणि तो जय पवार यांच्यापर्यंत येऊन थांबला.
कारण जय पवार यांनी देखील अचानकच अजित दादांनी इच्छा दाखवली, परवानगी दिली, तर आपण निवडणुकीला उभे राहू असे वक्तव्य केले होते. त्यामुळे नेमके कोण उभे राहणार? याची उत्सुकता होती. त्यानंतर मात्र अजित पवारांनी, मी देईल त्या उमेदवाराला निवडून आणा असा संदेश दिला. मग मात्र कार्यकर्त्यांचा संयम संपला आणि त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या वाहनांच्या ताफ्यापुढे झोपत आत्ताच उमेदवारी जाहीर करा असा तगादा लावला. आता मात्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची फक्त घोषणा करायची बाकी आहे. त्यामुळे बारामती युगेंद्र पवार हेच उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष थेट पाहायला मिळणार आहे. आता यावेळी काय घडणार? काका पुतण्याला भारी पडणार की, पुतण्या काकाला भारी पडणार? याची चर्चा आणि आडाखे आतापासूनच बांधले जाऊ लागले आहेत.
बारामतीकरांची 35 वर्ष कामे करणारे अजित पवार एकीकडे तर दुसरीकडे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असलेले युगेंद्र पवार समोर असणार आहेत, अर्थात तुलनेने पाहायला गेल्यास अजित पवारांची राजकीय ताकद व अनुभव लक्षात घेता, तुलनेत युगेंद्र पवार नवखे आहेत, मात्र युगेंद्र पवारांच्या पाठीमागे आजोबा शरद पवारांची मोठी ताकद असणार आहे. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे, उद्योगपती श्रीनिवास पवार, शरयू फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांची ताकद असणार आहे. त्यामुळेच या ऐतिहासिक निवडणुकीकडे फक्त राज्याचे नाही, तर देशाचेही लक्ष आत्तापासूनच लागले आहे.











