विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील एका उसाच्या शेतात पतंगाच्या मांजामध्ये अडकून दुर्मिळ अशा रक्तलोचन घुबडाचा बळी गेला असता, या ठिकाणी या घुबडावर कावळे देखील टपले होते. परंतु जागरूक नागरिक, पर्यावरण प्रेमींच्या प्रसंगावधानामुळे व बारामतीतील पर्यावरणीय दृष्ट्या सामाजिक काम करणाऱ्या बारामती रेस्क्यू टीमच्या स्वयंसेवकांनी वेळीच लक्ष घातले, म्हणून या घुबडाचा जीव वाचला.
माळेगाव येथील मधुकर येळे हे बारामतीवरून माळेगावला जात असताना रस्त्यालागत असणाऱ्या ऊस शेती व झुडपांजवळ आकाशात कावळे मोठ्या प्रमाणावर आढळून आले. ते जमिनीच्या दिशेने येऊन काव-काव करीत होते. येळे यांनी थांबून झुडपाच्या जवळ जाऊन पाहणी केली, तेव्हा असे लक्षात आले की एक मोठ्या आकाराचा पक्षी मांजा मध्ये अडकला आहे. त्यांनी लगेच बारामती रेस्क्यू टीमचे चे श्रेयस कांबळे यांना ही माहिती कळवली.
श्रेयस कांबळे यांनी टीममधील अभिलाष बनसोडे, अक्षय गांधी, शुभम पिसाळ यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोचल्यावर असे लक्षात आले की, सदर पक्षी हा अत्यंत दुर्मिळ जातीचे रक्तलोचन घुबड आहे. क्षणाचाही विलंब न करता रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला अतिशय शिताफीने योग्य व सुखरूपरित्या सोडवले व बारामती येथील वन विभाग यांच्या कार्यालयामध्ये घेऊन आले.
दरम्यान या घुबडाची पाहणी करताना असे लक्षात आले की, बराच काळ मांजामध्ये अडकून असल्यामुळे पक्षी अशक्त आहे व पक्षाच्या पंखाला मांजामुळे इजा झाली होती, त्यामुळे त्याच्यावर प्रथमोपचार करून नंतर या घुबडास पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट वाईल्ड लाईफ टी. टी. सी. येथे पुढील वैद्यकीय उपचार करण्याकरता दाखल करण्यात आले.
या संदर्भात श्रेयस कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे घुबड दुर्मिळ जातीत मोडणारे mottled wood owl (रक्तलोचन घुबड) आहे. या घुबडाला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अनुसार शेड्युल – १ अंतर्गत संरक्षण प्राप्त आहे. या घुबडाचे मुख्य खाद्य खारी, छोटे सरपटणारे प्राणी, उंदीर, सरडे, खेकडे, कीटक आहेत. हा पक्षी निशाचर असून, झुडपे तसेच जंगल क्षेत्रात वास्तव्याला असतो.
दरम्यान या उपचारानंतर सदर घुबडास पुन्हा आहे त्या ठिकाणी सोडणार आहोत, कारण त्याच परिसरात या घुबडाचे घरटे व जोडीदार असणार आहेत असे कांबळे यांनी सांगितले. रेस्क्यू टीम ही संपूर्ण महाराष्ट्रभरात वन्यप्राणी बचाव कार्य करीत आहे. आपल्या आजूबाजूस कोणताही वन्यप्राणी-पक्षी जखमी आडून आल्यास तात्काळ जवळच्या वन विभागाशी संपर्क साधावा किंवा रेस्क्यू टीम यांच्याशी संपर्क करावा. अशी माहिती टीम रेस्क्यू बारामतीचे श्रेयस रवींद्र कांबळे यांनी दिली.











