विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरोधात आहेत. अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यामध्ये राजकीय फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत झाली होती.
आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. आज बारामती मध्ये युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना बारामती विधानसभेत पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार का असा प्रश्न विचारल्यावर युगेंद्र पवार म्हणाले, ही लढाई पवार विरुद्ध पवार होईल का हे मला माहिती नाही.
सध्या आमच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. आणखी काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. तालुक्यातील वाड्यावर वस्त्यांवर आम्ही फिरलो आहे. याच्या अगोदर आपण आभार दौरा काढला होता. स्वाभिमानी यात्रा काढली होती. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बारामतीकर शरद पवार साहेबांना विसरू शकत नाहीत, विसरणार नाहीत हा विश्वास आम्हाला तिथे फिरताना बघायला मिळाला. असं युगेंद्र पवार म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, निवडणुका जाहीर होण्यासाठी बरेच दिवस थांबलो होतो. त्याची घोषणा झाली आहे. या आठवड्यात शरद पवार बारामती जागेबाबत निर्णय जाहीर करतील. लोकसभेला तुतारी चिन्ह नवीन होते. त्यावेळी पिपाणी चिन्हाला तुतारी नाव देण्यात आले होते. आता पिपाणी चिन्हाखाली पिपाणी आणि तुतारी चिन्हाखाली तुतारी असे लिहिले जाणार आहे. तुतारी हे चिन्ह लोकसभेला बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचलेलं आहे. यामुळे थोडासा त्रास होईल, मात्र जास्त फरक पडणार नाही. असंही युगेंद्र पवार म्हणाले.
तसेच बारामतीसह राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. भ्रष्टाचार बारामती मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलाय, बेरोजगारी वाढलीय,शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आज पण आहे. महिलांवर अत्याचार व्हायला लागले आहेत. असे अनेक प्रश्न आहेत काही रस्ते राहिलेत, वाड्या वस्त्यावरच्या पाईपलाईन राहिलेल्या आहेत ही सगळी कामं आता करावी लागतील. असं युगेंद्र पवार म्हणाले.











