ज्ञानेश्वर रायते, बारामती.
दोन दिवसांपूर्वी कॅनडामधील घडामोडींवरून बरीच घमासान चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून गुजरातच्या साबरमती येथील तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई या गुन्हेगाराच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई पोलिसांनी अनेकदा त्याच्या कोठडीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबई पोलिसांकडे त्याला हस्तांतर करता येणार नाही असं तेथील हायकोर्टाने वारंवार सांगितले आहे. मग हा लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या साबरमती तुरुंगातून पाकिस्तानच्या गुन्हेगारांशी संपर्क कसा साधतो? असे प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले.
लॉरेन्स बिश्नोई याच्या पाठीमागून नेमके कोण सूत्रे चालवत आहे? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित करण्यात आला असून, कॅनडामधील हिंसाचाराला भारतीय सरकारचे एजंट कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत कॅनडा सरकारने भारताच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांची कॅनडाच्या हिंसाचारात सामील असल्याच्या आरोपावरून हकलपट्टी केली. या संदर्भातील वृत्त वॉशिंग्टन पोस्ट ने दिले असून, कॅनडा पोलिसांनी थेट आरोप केल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त द हिंदू या वृत्तपत्र समूहाने देखील प्रकाशित केले आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर तर बिश्नोई म्हणजे फार मोठी ताकदवान गॅंग असल्याचे दिसू लागले आहे. अर्थात कडव्या हिंदुत्ववादी संघटनांनी लॉरेन्स बिश्नोई याचे कोडकौतुक सुरू केल्याने या सगळ्या घटनांना वेगळाच राजकीय वास येऊ लागला आहे. सलमान खान हा एक मोहरा आहे, परंतु मुंबईतील बॉलीवूड उत्तर प्रदेश कडे न गेल्याची सल आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचा पक्का पाया आपले राजकीय बस स्थान बसू देत नसल्याच्या रागातून काही राजकीय पक्ष यामध्ये वेगळ्या प्रकारची चाल खेळताना विकृत राजकारण करत आहेत का? असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
खरे तर बदलापूर मधील घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक झाले. का? तर या गुन्ह्यातील गुन्हेगार मारला गेला. गेल्या अनेक वर्षापासून या बिश्नोई गॅंगचे हे कारनामे सुरू आहेत. गुन्हेगार कोणीही असो, गुन्हेगार हा गुन्हेगाराचा असतो. मग जर उत्तर प्रदेशमध्ये बाहुबली गुन्हेगारांना पोलिसांच्या बंदोबस्तात मारले जाते, तर मग अशी विष्णोई गॅंग संपवायला भारत सरकारला कितीचा वेळ लागणार आहे? पण फक्त भारतातच नाही तर कॅनडासारख्या परदेशात देखील विष्णोई गॅंग च्या माध्यमातून कारनामे घडवले जात आहेत, असा आरोप तेथील सरकार करत असेल तर मात्र प्रकार विचित्र आहे.











