राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी दौंड विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दौंड मतदारसंघात ३ लाख १५ हजार ०४६ मतदार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा दौंड उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी ( दि १५) राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर विधानसभा मतदारसंघात स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले. आचारसंहितेची त्वरित अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. संदर्भात दौंड येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी नुकतीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली केली. यावेळी आचार संहिता, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कामकाजाची माहिती आणि सुचना देण्यात आली.
दौंड विधानसभा मतदारसंघात १ लाख ६१ हजार ७८३ पुरुष मतदार आणि १ लाख ५३ हजार २५२ महिला मतदार तसेच ११ तृतीय पंथीय मतदार असे एकुण ३ लाख १५ हजार ०४६ मतदार आहेत. तसेच मतदारसंघात ३१० मतदान केंद व २९ झोनल अधिकारी व १९ नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे १ हजार ५०० कर्मचारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दौंड, यवत व पाटस येथे ३ भरारी पथके २४ तास कार्यरत आहेत. तसेच कासुर्डी, नगरमोरी चौकी, दौड व पाटस येथे ३ स्थिर पथके २२ ऑक्टोबर २०२४ पासून कार्यरत होणार आहेत.
मतदान केंद्रावर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर!
मतदारसंघातील ५० टक्के मतदार केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत व वेबकास्टींग ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. मतमोजणी ही दौंड शहरातील नगरमोरी चौकातील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला व अरुण शेलार यांनी दिली.











