मुंबई : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली. विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने वाजवले असून 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील मतदान प्रक्रिया होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. एका टप्प्यातच हे मतदान होणार असून नांदेड लोकसभा पोटनिवडणूक देखील होणार आहे.
महाराष्ट्राची चौदावी विधानसभा 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार असल्याने त्याआधी निवडणूक होऊन नवे कारभारी निवडले जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे आयोगासाठी बंधनकारक असलेल्या या प्रक्रियेनुसार महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर करत असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी राज्यात 4.94 कोटी पुरुष मतदार तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या देखील राज्यांमध्ये 5997 असून, दिव्यांग मतदारांची संख्या सहा लाख 32 हजार एवढी आहे. यावर्षी पहिल्यांदाच मतदान करणार्या नवीन मतदारांची संख्या 19,48,000 असून हे मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
राज्यातील विधानसभेची निवडणूक करण्यासाठी सुविधा पोर्टल नावाचं ॲप निवडणूक आयोगाने जारी केलं असून या ॲपवर नागरिकांना तक्रारी देखील करता येणार आहेत. जर एखाद्या ठिकाणी काही अपरिचित घटना घडली किंवा उशिरा मतदान सुरू असेल तर फोटो काढून या ॲप्लिकेशन वर अपलोड करावा. या ठिकाणी पुढच्या 90 मिनिटात निवडणूक आयोगाची टीम पोहोचेल असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 52 हजार 789 ठिकाणी एक लाख 186 मतदान केंद्रे असून, शहरी भागामध्ये यापैकी 42 हजार 604 तर ग्रामीण भागामध्ये 57,582 मतदान केंद्रे असतील. साधारणपणे सरासरी 960 मतदार एका बुथवर मतदान करतील.











