इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रवीण माने व आप्पासाहेब जगदाळे यांनी बंडाचे निशाण फटकावले तर दुसरीकडे आज गेल्या काही वर्षात भाजपशी संलग्न राहिलेले छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी मात्र शरद पवारांची भेट घेत तुतारीचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला.
चार दिवसापूर्वीच पृथ्वीराज जाचक व अजित पवार एकत्र आल्याची माहिती राजकीय वर्तुळात पसरलच होती. त्यावेळी पृथ्वीराज जाचक यांनी या संदर्भातील खुलासा करत राजकारण राजकारणाच्या जागी मात्र परंपरा पाळली पाहिजे असे स्पष्ट केले होते. छत्रपती कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर काढणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे जाचक वारंवार सांगत आहेत.
त्याच अनुषंगाने जाचक यांनी वेळोवेळी कारखान्याच्या संदर्भात तडजोडी देखील केल्या. मध्यंतरी अजित पवारांसोबत एकत्र आले देखील, मात्र छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाशी त्यांचे सूत शेवटपर्यंत जुळलेच नाहीत. गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज जाचक यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती.
आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व पृथ्वीराज जाचक यांची भेट झाली. यावेळी उद्योगपती श्रीनिवास पवार हेही उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांची कारखान्यासंदर्भातील भूमिका योग्य असल्याचे मत व्यक्त करत कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपल्या पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले, तर दुसरीकडे विधानसभेत तुतारीचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले.











