बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी (ता. १५ )उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर ढोल बजाव आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला असून, त्यापूर्वी सोमवारी धनगर समाजाच्या वतीने राज्य सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती मधील समावेशाच्या आरक्षणाबाबत जीआर काढावा अशी मागणी केली होती.
मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी समोर धनगर आंदोलक ढोल बजाव आंदोलन करणार आहेत या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन संघटनेच्या वतीने ही माहिती देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करून आरक्षणाच्या सवलती मिळाव्यात यासाठीची मागणी प्रलंबित आहे.
या मागणीसाठी धनगर समाजाने बारामती पासून आंदोलनाची सुरुवात केली होती. सन 2014 पासून धनगर समाज यासाठी आक्रमक आहे, मात्र अजूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना धनगर समाजामध्ये आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीची शेवटची मंत्रिमंडळ बैठक म्हणून सोमवारी राज्य सरकारने या संदर्भात अध्यादेश काढावा अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा प्रकारचा कोणताही निर्णय समोर न आल्याने आता धनगर बांधवांच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे.











