राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची अपेक्षा सोडावी, त्या ऐवजी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी त्यांना पन्नास हजाराच्या मताच्या आघाडीने विजयी करु कशी खुली ऑफर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते उत्तमराव गायकवाड यांनी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीत खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दौंड तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी थोरात यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका घेतली होती.
मात्र त्यानंतरही रमेश थोरात हे 15 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मलाच नाही, अशी माहिती थोरात यांनी दिल्याने थोरात यांच्या आगामी राजकीय भवितव्याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यामुळे थोरात यांच्या समर्थकांमध्ये चिन्ह अस्वस्थता आहे.
त्यातच रमेश थोरात हे ठोस असा राजकीय निर्णय घेत नसल्याने ऐन वेळी ना घर का ना घाट का अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशातच वंचित बहुजन आघाडीने रमेश थोरात यांना आगामी विधानसभेसाठी खुली ऑफर दिली आहे. थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रवादीचे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी त्यांना ५० हजाराच्या मतांच्या आघाडीने विजयी करण्याची जबाबदारी आमची. यंदा भाजप आमदार राहुल कुल पानिपत निश्चित आहे असे ते म्हणाले.
आमदार कुल यांच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभारावर जनता नाराज आहे. कुल यांच्या केवळ विकासाच्या पोकळ गप्पा आहेत. प्रत्यक्षात मात्र सर्व निकृष्ट दर्जाची काम आहेत. आपल्याच बगलबच्चांना जगवण्याचे काम कुल यांनी आतापर्यंत केले आहे. सत्तेचा गैरवापर करत त्यांनी शासकीय यंत्रणा खुळखुळी केली आहे. कुल यांना फक्त वंचित बहुजन आघाडी टक्कर देऊ शकते. दौंड तालुक्यातील दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतदार हा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे. त्यामुळे रमेश थोरात यांनी कोणताही विचार न करता थेट वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी ते पन्नास हजाराच्या मतांच्या आघाडी घेऊन विजयी होतील असा विश्वास गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रमेश थोरात यांना घेण्यास काही ठराविक कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असून खासदार सुप्रिया सुळेही थोरात यांना घेण्यास इच्छुक नसल्याचे तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे रमेश थोरात पुढील दोन दिवसात काय निर्णय घेतात आणि कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.











