दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे सुपुत्र किरण सोनावणे यांचा साताराभुषण पुरस्कार देवुन मुंबईत सलमान करण्यात आला सातारकरांच्या भव्य दसरा मेळाव्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी मुंबईमध्ये सातारकरांचा भव्य दसरा मेळावा होतो. यामध्ये सातारा रत्न आणि सातारा भूषण हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी देखील या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वाई तालुक्यातील ओझडे गावचे सुपुत्र किरण सोनावणे यांचा सातारा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात राहत असलेल्या व मूळच्या साताऱ्यातील असलेल्या सातारा वासियांचा दसरा मेळावा हा दादर येथील शिवाजी मंदिर येथे पार पडला.
या मेळाव्यात राजकीय रत्न म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कला रत्न – राहुल भंडारे, कामगार रत्न – मनोज धुमाळ, क्रीडा रत्न – विनया माने, साहित्य रत्न – अरुण गोडबोले , शैक्षणिक रत्न – अंजली गोडसे, सामाजिक रत्न – विकास धनवडे, उद्योग रत्न – शिवाजीराव माने, पत्रकारिता – निलेश बुधावले, वैद्यकीय रत्न – डॉ. अरुण माने, कायदा रत्न – ऍड. पांडुरंग पोळ, प्रशासकीय रत्न – सोमनाथ घार्गे (भापोसे ), सहकार रत्न – विनायक गाढवे असे पुरस्कार वितरित करण्यात आले.
तर सातारभूषण पुरस्कार हा किरण सोनवणे, संपत शेवाळे, सुरेश गोडसे, प्राची कोल्हटकर-जांभेकर, कु. भार्गव जगताप यांना तसेच वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या सातारा भवनसाठी एका भूखंडाची निवड केली असून लवकरच तो ताब्यात घेऊन त्याची निर्मिती केली जाईल, अशी घोषणा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम निकम यांनी सातारकरांच्या उपस्थितीत केली.
या कार्यक्रमावर रतन टाटा यांच्या निधनाचे सावट होते. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मोहनबुवा रामदासी, मठाधिपती विठ्ठल स्वामी (महाराज) वडगांव जयराम स्वामी, कायदेतज्ज्ञ ऍड. उदय वारुंजीकर तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोहनबुवा रामदासी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सातारा जिल्ह्याचे महत्व विशद केले. सत्कारमूर्तींच्या वतीने प्राची कोल्हटकर- जांभेकर, सुरेश गोडसे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
संघटनेचे अध्यक्ष नाना निकम, उपाध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने तसेच उपाध्यक्ष ऍड. राजाराम शिंदे, सचिव महेश पवार, खजिनदार दिपक यादव, सहखजिनदार श्रीधर फडतरे, विश्वस्त सर्वश्री दिनकर गाढवे, दत्ताजीराव फाळके, अनिल जाधव, सुभाष चव्हाण, एकनाथ तांबवेकर, शिवाजीराव जाधव, ऍड अशोक चव्हाण, प्रा. रमेश मोरे, पद्मावती शिंदे, आसावरी भोईटे, सागर घाडगे, समर्थ देशमुख आदी विश्वस्त उपस्थित होते.











