ज्ञानेश्वर रायते, बारामती.
राज्यभरात अल्पवयीन मुलांची लैंगिक गुन्हेगारी वाढत असल्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत. लहान मुली देखील या गोष्टींना बळी पडत आहेत. या साऱ्याची सुरुवात कुठून होते हे माहीत असूनही सगळीकडेच चुप्पी साधली जाते आहे. यातीलच एक मूळ कारण बनले आहे, सध्या लाटेप्रमाणे सुरू असलेले विविध मोठी शहरे लहान शहरे व बाजारपेठा मोठे असलेल्या गावांमधील कथित कॅफे!
पूर्वी कॅफे म्हटलं की तिथं चहा कॉफी मिळणार आणि साधारणपणे नंतरच्या काळात नाष्टा. पण आता सध्या अनेक शहरांमध्ये कॅफे सुरू आहेत. थेट बोलायचं झालं, तर ती कमी अधिक प्रमाणात वेश्याव्यवसायाला खतपाणी घालणारी ठिकाणे आहेत. आता ही कॅफेची फॅशन कोणी सुरू केली आणि कुठून सुरू झाली? परदेशातील प्रत्येक गोष्टींचे अनुकरण आपण का करतो? त्यासाठी जे फंडे शोधले जात आहेत, त्यातूनच लैंगिक गुन्हेगारी वाढते आहे. फक्त म्हणायला बेरोजगार युवकांनी कॅफे सुरू केले, परंतु हे कॅफे नेहमीच्या उपहारगृहापेक्षा वेगळे आहेत. अगदी सरळ सांगायचे तर, लॉजवर खूप पैसे जातात, त्याऐवजी हा कमी पैशाचा शॉर्टकट मुलं आणि मुली वापरत आहेत. एका बेरोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आख्खी पिढीच बरबाद करण्याला आपण प्रोत्साहन देत आहोत का?
हे कॅफे नेमके कोणाच्या आधाराने चालतात? बारामती सारख्या निमशहरी तालुक्याच्या भागात फक्त शहरातील एकाच भागामध्ये 27 कॅफे आहेत. दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गोंधळ मिसळ या कॅफेवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी अनेक मुलं मुली या कॅफेत होते आणि त्यांची पळापळ झाली. पोलिसांनी कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला.
असा छापा बारामतीत देखील काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी घातला होता. त्यावेळी पोलिसांनी कॅफेमधील अंतर्गत कंपार्टमेंट काढून टाकण्याची सूचना कॅफे चालकांना दिली होती. परंतु त्यानंतर परिस्थिती तशीच राहिली. या कॅफेमध्ये दिवसा देखील अंधार असतो. छोटे छोटे कंपार्टमेंट केलेले आहेत. या कंपार्टमेंटमध्ये मुलांना आणि मुलींना नावाला बोलण्यासाठी परंतु प्रत्यक्षात अश्लील चाळे करण्यासाठीची एक संधी खुलेआम दिली जाते. थोडक्यात हे अश्लील कॅफे म्हणजे निम्न स्वरूपातील वेश्याव्यवसाय आहेत. कारण इथे बसण्यासाठी तासाला शंभर रुपये अथवा तेथील अंतर्गत सजावटी नुसार अधिकचे रुपये मोजावे लागतात.
ओयो हॉटेल किंवा लॉज मध्ये अशाच स्वरूपाचे धंदे केले जातात ना? मग वर्दळीच्या भागात असे कॅफे बिनधास्तपणे अर्धा वेश्याव्यवसाय करत असतील तर त्यांना परवानगी का दिली जाते? त्यांच्यावर छाप्याची नाटके का केली जातात? काही दिवसांनी हे कॅफे आहेत, तसेच बिनधास्तपणे का चालतात? हे स्थानिक लोकांना कळत नाही का? सगळं कळतं आणि त्यामागील अर्थकारणही!
मुळात गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड इथून सुरू झालेली अनैतिकतेची प्रवासाची व्याख्या आता कॅफे नावाच्या वेश्याव्यवसायापर्यंत पोहोचली आहे. लॉजपेक्षा स्वस्त एवढच त्याचा व्याख्येचा भाग आहे. तिथूनच पुढे लैंगिक गुन्हेगारीला आमंत्रण मिळते. राज्य सरकारला खरोखरच अशा प्रकारच्या अल्पवयीन लैंगिक गुन्हेगारीला आळा घालायचा असेल, तर त्याची सुरुवात अशा अनधिकृत व्यवसायांपासून केली पाहिजे. त्यांचा बिमोड झाला नाही, तर कसलेही शक्ती कायदे करा, त्या शक्तीत काहीच अर्थ उरणार नाही.
दुसरीकडे पुण्यातील पोर्शे कारचे प्रकरण देखील पाहायला गेले, तर अल्पवयीन मुलांना बिनधास्तपणे दारू वितरण करण्यात आली होती. ही सारी लक्षणे याच गुन्हेगारीच्या मुळाची लक्षणे आहेत. वाईन शॉप मधून अल्पवयीन मुले दारूच्या बाटल्या सर्रासपणे घेऊन जातात, त्याचे काहीच मोजमाप नाही. पुण्यातही अग्रवालचे प्रकरण घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने अनेक क्लब आणि पब यांच्यावर छापे घातले. त्यातील अनधिकृत पब आणि त्यांची बांधकामे तोडण्यात देखील आली, पण त्यानंतर काय घडलं?
जसं पुलाखालून पाणी गेलं, वातावरण थोडं निवळलं, आता पुन्हा सगळं सुस्थितीत सुरू आहे. फार काही घडलं नाही, फक्त हप्ते वाढले आहेत. म्हणजे कोणाच्या तरी मरणानंतर कोणाचे तरी आर्थिक फायदे झाले आहेत. आताही दारू विकणाऱ्यांवर कोणाचे बंधनही नाही आणि लक्षही नाही. अल्पवयीन मुले वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करत आहेत, अगदी मेंफेटेराईन सारखी इंजेक्शन्स जिममध्ये दिली जात आहेत. तीच इंजेक्शन नंतरच्या काळात लैंगिक क्रियेसाठी वापरली जात आहेत. त्यातूनच पुढे गुन्हेगारीला उत्तेजन मिळत आहे. म्हणूनच फांद्या छाटण्यापेक्षा मुळावर घाव घालणार असाल, तरच काहीतरी फायदा होईल. अन्यथा लोकानुनयी राजकारण करण्याच्या नादात प्रश्न तसेच विभक्तपणे राहतील. दरवेळी नवे नवे गुन्हे घडत राहतील!











