विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे या गावचा सुरत चव्हाण बिग बॉस ५ या सिझनचा विजेता झाला आहे. बिग बॉस मराठी ५’ चा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आणि या सोहळ्यात रीलस्टार सुरज चव्हाण याने ‘बिग बॉस मराठी ५’ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका रीलस्टारने ‘बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे. त्याच्यावर प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
गुलिगत धोका फेम सुरज हा बारामतीच्या एका छोट्याश्या मोढवे गावातला मुलगा आहे. रील बनवून टिकटॉकवर सूरजला प्रसिद्धी मिळाली होती. अत्यंत गरीब परिस्थितीतून वर येत सूरज चव्हाण ने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे.सुरज चव्हाण ने वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं कामही केलं. त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे,टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता बारामतीचा बिग बॉस ठरला आहे.
सुरज ला या विजेतेपदाबद्दल पुन्हा गाडगीळ ज्वेलर्स यांच्याकडून दहा लाख रुपयांचा, तर कलर्स मराठी वाहिनीकडून 14 लाख 60 हजार रुपयांचा धनादेश मिळाला. या शोमध्ये गेल्यापासून सुरज चव्हाण हा निरागसपणे ही ट्रॉफी माझीच असे सांगत होता आणि अखेरच्या क्षणी देखील त्याने दिग्गजांना मागे टाकत ही ट्रॉफी मिळवली. सुरज चव्हाण मुळे या शोची चर्चा संपूर्ण देशभरात झाली.











