फलटण : महान्यूज लाईव्ह
पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे आता तर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडला आणि आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे देखील आता तुतारीच्या वाटेवर आहेत असे बोलले जात आहे आज संध्याकाळी रामराजे नाईक निंबाळकर यासदर्भात मेळावा आयोजित करत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला दररोज धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता महायुतीतून रामराजे नाईक निंबाळकर देखील शरद पवारांच्या गोटात सामील होत आहेत. फलटण तालुक्यात रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकरांकडून या संदर्भातील संकेत मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आचारसंहितेपूर्वीच अनेक नेत्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळेच पितृअमावस्या होईपर्यंत वाट पाहत असलेल्या नेत्यांनी आता निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे.
त्यामध्येच रामराजे नाईक निंबाळकर देखील एक असून रामराजे नाईक निंबाळकरांसमवेत फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची साथ सोडू शकतात. दरम्यान हा मेळावा संध्याकाळी होत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कथित संभाव्य निर्णयाचे वृत्त फेटाळले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेला मेळावा कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी घेतलेला आहे, याचा अर्थ ते आणि दीपक चव्हाण शरद पवार गटात जाणार असा होत नाही. महायुतीचे नेते इतर पक्षात जात असले तरी रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतः देखील यापूर्वी स्पष्ट केलेले आहे, त्यामुळे ते कोठेही जाणार नाहीत असे मत व्यक्त केले.











