इंदापूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये डावलले जात असल्याची भावना झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपमध्ये देखील बंड केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे अस्वस्थ होते. दत्तात्रय भरणे यांची महायुतीतील उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत मिळताच, त्यांनी आपण दोन दिवसात भूमिका जाहीर करू असे सांगितले. उद्या ते इंदापुरात पत्रकार परिषद घेणार असून 6 अथवा 7 ऑक्टोबर रोजी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होणार आहे.
आज हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अंकिता पाटील यांच्या स्टेटसवर तुतारी झळकली आणि कार्यकर्त्यांनी तुतारीचा नारा दिला. काल भारतीय जनता पक्षाच्या शिरसस्थ नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांच्या हाती काही लागले नाही आणि नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी आता हा शेवटचा नारा म्हणत रात्रीच तुतारीच्या घोषणा दिल्या.
हर्षवर्धन पाटील उद्या सकाळी 11 वाजता इंदापुरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यापूर्वीच आज सकाळी अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर तुतारीचे स्टेटस झळकले. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा तुतारीचा प्रवेश नक्की झाला, याची कुणकुण कार्यकर्त्यांना लागली आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे भाजपमधून बंड करणार आणि भाजप सोडणार याचे संकेत मिळत होतेच, मात्र हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर जाणार की पुन्हा स्वगृही काँग्रेस बरोबर जाणार याची चर्चा सुरू होती. आता मात्र हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर जाणार हे निश्चित झाले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे काम केले, मात्र त्या बदल्यात दरवेळी लोकसभेला आपल्याकडून काम करून घेतले जाते आणि विधानसभेला शब्द फिरवला जातो हे निवडणुकीच्या अगोदर जे हर्षवर्धन पाटील सांगत होते, तेच पुन्हा होणार असे निश्चित होताच त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करा अन्यथा उशीर होईल, असा दबाव कार्यकर्त्यांकडून देखील येत होता. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी ही चर्चा केली आणि भारतीय जनता पक्षाकडून काहीही आश्वासक हाती लागत नसल्याचे दिसताच त्यांनी आपल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे.











