बारामती : महान्यूज लाईव्ह
गुरुवारी (ता. ३ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बारामती तालुक्यातील विधानसभेची राजकीय घटस्थापना करणार आहेत. जनसमान यात्रेच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बारामती तालुक्याचा भरगच्च दौरा करत आहेत. या दौऱ्या दरम्यान बारामती शहरासह तालुक्यातील दोन ठिकाणी ते बूथ कमिटी व कार्यकर्त्यांची मेळावे घेणार आहेत.
गुरुवारी सकाळी सहा वाजताच ते शासकीय विश्रामगृहावर जिल्हा पोलीस प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेणारा असून गेल्या काही दिवसात बारामती मध्ये घडलेल्या विविध गुन्हेगारी घटना व नुकत्याच घडलेला शालेय विद्यार्थ्यांचा खून या साऱ्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा ते आढावा घेणार आहेत.
सकाळी बारामती शहरातील वृंदावन लॉन्स येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या नोंदणी उपक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर ते साडेदहा वाजता बारामती शहर व परिसरातील बूथ कमिटी व कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता ते होळ येथील सोमनाथ मंगल कार्यालयात बुथ कमिटी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
यानंतर जळगाव कडेपठार येथील विविध विकास कार्यकारी सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करून काऱ्हाटी येथील ग्रामपंचायतच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार आहेत. यानंतर संध्याकाळी पाच वाजता ग्रामपंचायत सुपे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन करून सुपे गावातीलच माऊली गार्डन येथे बुथ कमिटी व कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा बारामती दौरा झाला होता. त्यानंतर आता आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून अजित पवार हे विधानसभेच्या निवडणुकीचे रणसिंग फुंकतील.











