ज्ञानेश्वर रायते, बारामती.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून विद्यमान आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत मिळत असतानाच, महायुतीमध्ये अजूनही जागावाटप नसल्याने सगळं शांत आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता ठरण्याची चिन्हे आहेत, कारण कार्यकर्त्यांचा हर्षवर्धन पाटलांवर असणारा दबाव आणि दुसरीकडे शरद पवारांची राज्यभर सुरू असलेली फिल्डिंग या सगळ्या पार्श्वभूमीवर अमावस्येनंतर इंदापुरातील राजकारणाचा धुरळा उडण्याची चिन्हे आहेत.
हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून लढणार की तुतारी हातात घेणार? याविषयी चर्चा सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुप्रिया सुळेंसाठी तारणहार ठरलेले आप्पासाहेब जगदाळे तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे दोन्हीही मातब्बर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारीत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हातात घेतली, तर या दोघांचं काय? हा प्रश्न असेलच, शिवाय जर हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतणार असतील, तर इंदापुरात बंडखोरीचा आगडोंब उसळणार का? या अनेक प्रश्नांची उत्तरं सर्वपित्री अमावस्येनंतर मिळण्याची शक्यता आहे. कारण सगळेजण अमावस्यासाठी शांत राहिलेले आहेत.
इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील दोन पर्याय निवडू शकतात, कार्यकर्ते अपक्ष उमेदवारी जाहीर करा असे म्हणत असले तरी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यास इंदापूर तालुक्यातील लढत तिरंगी होऊ शकते. आप्पासाहेब जगदाळे किंवा प्रवीण माने या दोघांपैकी एक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा असू शकतो. अशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटील काँग्रेसचाही पर्याय निवडू शकतात.
कारण काँग्रेसमध्ये 2014 पूर्वी हर्षवर्धन पाटील हे प्रमुख नेत्यांमध्ये एक होते, तोही एक पर्याय हर्षवर्धन पाटलांसाठी असू शकतो, महाविकास आघाडी असल्याने अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हर्षवर्धन पाटलांचे काम करावे लागेल मात्र बंडखोरी अथवा तिरंगी लढत टाळण्यासाठी पाटील थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये जाऊ शकतात. अर्थात या सगळ्यांना मुहूर्त कधी? असा कार्यकर्त्यांमध्ये आणि विरोधकांमध्येही संभ्रम आहे, तर येत्या सर्वपित्री अमावस्येनंतर इंदापुरातील बरेच पत्ते खुले होऊ शकतात आणि राजकारणाचा धुरळा उडू शकतो.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्षही या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विशेषतः दत्तात्रय भरणे हे राजकारणातील परिस्थितीचे आकलन करण्यासाठी माहिर आहेत. तेही गेल्या काही दिवसांपासून कोणतेही वक्तव्य करत नाहीत. एकंदरीतच हर्षवर्धन पाटील यांच्या हालचालीवर त्यांच्या नियोजनाचे लक्ष असणार आहे.
एकंदरीतच धनगर समाजाचे राज्यातील प्रभावशाली नेते म्हणून दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसाठी महत्त्वाचे असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी इंदापूरची जागा ही तेवढीच महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे पहिल्या पंचवीस मध्येच दत्तात्रय भरणे असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. दुसरीकडे भाजपकडून ही आश्वासक अशी वक्तव्य केले जात नसल्याने हर्षवर्धन पाटील यांचे समर्थकही अस्वस्थ आहेत.











