राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : लोकसभेच्या विजयानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दौंडमध्ये चांगली लोकप्रियता मिळाली आहे. आगामी विधानसभेसाठी दौंडमधून इच्छुकांची संख्या वाढली आहे. पाटस येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत तात्या शितोळे यांनी ही आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांनी नुकताच पत्रव्यवहार केला आहे. आगामी विधानसभा ही भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यासमोर भक्कम आव्हान उभे करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही परिस्थितीत दौंड विधानसभेची जागा जिंकून आणायची असा निर्धार केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि २३) पाटस येथील कालकथित भंते तिसावरो उर्फ बाबा पानसरे यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे यांनी आगामी विधानसभेसाठी दौंडमधून सातशे इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत. अशी माहिती दिली. त्याचवेळी पाटस येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आगामी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दिला आहे.
प्रशांत शितोळे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असुन ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना तालुक्यात मतांची आघाडी मिळाली यात प्रशांत शितोळे यांचेही योगदान आहे. कोरोना महामारीच्या काळात पाटस परिसरातील वंचित आणि दुर्बल घटक, गोरगरिबांना धान्य वाटप केले होते, तसेच नाभिक बांधवांनाही आर्थिक मदतीचा हात दिला होता.
राजकीय कामाबरोबरच ते सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषद पाटस गटात अंतर्गत रस्ते, जिल्हा परिषद परिसरातील शाळा, वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांची दुरुस्ती, ओढ्या नाल्यांवरील पुलांची बांधकामे असे अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावली आहेत. शितोळे यांचा दौंड तालुक्यात जनसंपर्क दांडगा असुन प्रशासकीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे.
तालुक्यातील सात गावे शितोळे कुटुंबांशी संबंधित असून तालुक्यात मित्र आणि नातेवाईक परिवार मोठा आहे. नामांकित सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, बिगर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे केली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शितोळे यांनी जोरदार तयार केली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ही पक्षाकडून पत्राद्वारे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याबाबत अर्ज दिला आहे.
मात्र पक्ष जो उमेदवार देईल त्याचे प्रामाणिकपणे काम केले जाईल अशी माहिती शितोळे यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून इच्छुकांची यादी वाढल्याने पक्ष श्रेष्ठींची ही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.











