जामखेड : महान्यूज लाईव्ह
मी राजकारणात आलो आणि माझे काळे केस पांढरे झाले. पण मी तसेच ठेवले. पण काही जणांना तरुणाविरोधात निवडणूक लढवायची असल्याने पांढरे झालेले केस काळे करत ते तरुणांसारखे ड्रेस घालतात अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना टोला लगावला.
मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोहित पवारांनी वरील चिमटा काढला. यावेळी माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यासपीठावर होते.
रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात काही भागात मला कमी मतदान मिळाले, पण मी विचार केला नाही. कोणताही भेदभाव न करता मी काम केले. सायकल वाटप असेल किंवा टॅंकरने पाणीपुरवठा असेल, मी माझ्या मतदारसंघात पूर्ण परीने काम करण्याचा प्रयत्न केला, पण राजकारण करणारे मात्र कुठेही राजकारण करतात.
सायकल वाटप करताना मी भेदभाव केला नाही. माझ्या विरोधकांच्या मुलांनाही सायकली मिळाल्या. आता लहान मुलांचा तिथे काय दोष? निवडणुकीपुरते राजकारण करावे आणि निवडणूक झाल्यावर समाजकार्य करावे, पण काही जणांना हे कळत नाही. त्याला मी तरी काय करणार?
रोहित पवार पोरांना लहान मुलांना चॉकलेट देतात असा आरोप माझे विरोधकांनी केला. मी माझ्या लहान भावांना बहिणींना चॉकलेट देत असेल, तर तुम्हाला काय वाईट वाटते नको? त्या गोष्टीवरून राजकारण करू नका. मूळ मुद्द्यावर या असा इशारा रोहित पवारांनी दिला.











