राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : आमदार राहुल कुल यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीराला तालुक्यातील रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे १३ हजार ८०० रुग्णांची नोंदणी व तपासणी करण्यात आली. तालुक्यातील बोरीपार्धी येथील बोरमलनाथ मंदीर परिसरात गुरुवारी (दि १८) महा आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात सुमारे १३ हजार ८०० रुग्णांची नोंदणी व तपासणी झाली.
तपासणी ते संपूर्ण उपचार अशा प्रकारचे हे शिबिर आहे. पुण्यातील ५० हून अधिक नामांकित हॉस्पिटलांनी या महाआरोग्य शिबिरात सहभाग घेतला होता. यामध्ये सुमारे ३ हजाराहुन अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सुमारे ८०० दिव्यांगाना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले की, स्वर्गीय आमदार सुभाष कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दहा वर्षात आरोग्याच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी आहे. यापुढील काळात आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यात येणार असून या आरोग्य शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळेपर्यंत आम्ही सर्वजण त्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी यावेळी रुग्णांना दिले. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक जाधव यांनी केले.
याप्रसंगी माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भिमा पाटसचे कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माऊली ताकवणे, धनाजी शेळके, तुकाराम ताकवणे, हरिभाऊ ठोंबरे, धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके आदी उपस्थित होते.











