डाॅ. सुजीत अडसुळ, बारामती.
दिवाळी संपली की गडचिरोलीच्या कॅम्प चे वेध सुरू होतात. आम्ही दरवर्षी पुणे ते नागपूर असा विमानप्रवास करतो आणि मग नागपूर ते गडचिरोली असा 185 km अंतराचा प्रवास कार मधुन.पण या वेळी मात्र सगळ्यांनी समृद्धी महामार्गावरुन जायचे ठरवले आणि आम्ही तयारीला लागलो.
5 जानेवारीला औरंगाबाद जवळ जालना एक्स्चेंजला आम्ही समृद्धी महामार्ग जॉईन केला. सकाळचे 10 वाजले, तरी कडाक्याची थंडी होती. पण प्रवास मात्र सुखकर होता. सहा पदरी सीमेंट रोड, पलीकडे त्याला दोन्ही बाजूला उंच कंपाऊंड, ठराविक अंतरावर असणारे पेट्रोलपंप आणि रोड एक्स्चेंजर्स. माझा विटा येथील जिवलग मित्र आणि भुलतज्ञ डाॅ वैभव टाटा सफारी घेऊन आला होता.
गाडी क्रुज कंट्रोल मोडवर होती आणि अगदी पोटातले पाणी सुद्धा न हालता आम्ही अपेक्षेपेक्षा कमी वेळेत अमरावती एक्स्चेंज पर्यंत पोहोचलो. तिथून मग यवतमाळ आणि चंद्रपूर मार्गे गडचिरोलीला रात्री आठ पर्यंत थेट गडचिरोलीतील सर्च (SEARCH) येथे. तो पर्यंत मी समृद्धी महामार्गाचे केलेले FB live माझ्या आधी त्या कॅम्पस मध्ये पोहोचलेले होते. गडचिरोली तील हॉस्पिटल मधील अनेक स्टाफ व मित्रांनी ते पाहिलं होते आणि रात्री पोहोचल्यावर त्यांनी भेटून त्या बद्दल काॅमप्लिमेंट्स पण दिल्या.
प्रवासात थकलो असलो तरी दुसर्या दिवशी, सकाळी सूर्योदयाच्या पूर्वीच जाग आली. थोडासा व्यायाम आणि मेडीटेशन करून मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलो. आता चेहरे ओळखते येतील एवढे उजाडले होते. बरोबर सहा वाहता मोठ्या आवाजात घंटानाद झाला आणि अनेक स्वयंसेवक हातामध्ये झाडू, खराटा, खोरे, घमेल घेऊन स्वच्छता करण्यासाठी बाहेर पडत होता. त्याच वेळी स्वतः पद्मश्री डॉ अभय बंग सर सुद्धा हातात झाडू घेऊन कॅम्पस मधील स्वच्छता करण्यासाठी चालले होते आणि भेटल्यावर मी त्यांचे दर्शन घेतले.
काय सुजित,कसा झाला प्रवास? थकला नाहीस ना? भेटूया, दुपारी मी येतो ऑपरेशन थिएटर मध्ये. एवढं बोलून सर परिसर स्वच्छतेसाठी अभ्यासिकेच्या दिशेने गेले. सकाळी प्रथेप्रमाणे आम्ही आधी मां दंतेश्र्वरीची पुजा करून कॅम्पला सुरुवात केली. दर वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना आम्मा ( म्हणजे पद्मश्री डॉ राणी बंग) आमची ओळख करून देतात, पण या वेळी आजारपणामुळे त्या नव्हत्या, त्यांना खुप मिस केले.
सकाळी 8 वाजता कामकाज सुरू केले. आधीच सुचना दिलेल्या असल्यामुळे पाहिल्या तासाभराच्या केसेस प्लॅन्ड होत्याच. तीनही ऑपरेशन थिएटर मध्ये हळूहळू आम्ही ऑपरेशन सुरू केले. सहा अत्याधुनिक ऑपरेशन टेबल्स. 4 स्त्री आरोग्यतज्ञ, 4 सर्जन्स, 4 भुलतज्ञ आणि काही स्वयंसेवक अशी आमची टीम होती.
साधारणपणे तासाभरात एकूण सहा सर्जरीज होत होत्या. भुल दिलेले पेशंट जरा सेटल झाले की, मी स्थानिक RMO डॉ मयुरी आणि डॉ दत्ता यांच्याशी चर्चा करून पुढच्या क्रम ठरवत होतो. पुढचे पेशंट रिकव्हरी रुममध्ये घेणे, त्यांना आधी तपासणे, त्यांच्या रक्ताचे, सोनोग्राफी चे, ECG चे रिपोर्ट्स पाहण्याचे काम डॉ वैभव व मी करत होतो. डॉ स्वाती मॅडम प्रत्येक पेशंट ला व्यवस्थित तयार करण्या साठी मदत करत होत्या.
लहान मुलांच्या सर्जरीआधी त्यांना सुई लावण्याचं अवघड काम त्या स्वतः बालरोग तज्ज्ञ असल्यामुळे पटकन करत होत्या.आमचे डॉ मिलिंद शाह (पथकप्रमुख), डॉ माणिक व डॉ शर्मिला गुर्रम, डॉ.दास हे स्त्रीरोगतज्ञ तसेच डॉ गिरीश पेंढारकर, माझा जिवलग मित्र डॉ प्रमोद, डॉ. संदीप व डॉ स्वाती श्रोत्री, डॉ अमित मांढरे हे सर्जन्स अत्यंत काळजीपूर्वक व कुशलतेने शस्ञक्रिया पार पाडत होते.
डॉ जयंत पाटील, डॉ अरुणा रसाळ, डॉ वैभव माने आणि मी ही माझी भुलतज्ञ टीम तर कोणत्याही केस साठी व कसल्याही इमरजन्सी साठी सतत तयार होतीच. मोठा प्रशासकीय अधिकारी असणारा माझा मित्र डॉ प्रशांत रसाळ हा सुद्धा भक्तीभावाने यात सहभागी असतो. आम्ही आलटून पालटून चहा, कॉफी, नाश्ता साठी थांबत होतो. रेस्टरूम मध्ये भेटल्यावर अवांतर विविध विषयांवर चर्चा होतच होती.
जसाजसा वेळ जात होता तसा तसा आमच्या कामाचा उरक ही वाढत होता. दुपारी पद्मश्री डॉ अभय बंग सर OT मध्ये येऊन गेले. सगळ्यांची चर्चा केली. मला शेजारी बसवलं. आवर्जुन चौकशी केली. पद्मश्री डॉ राणी बंग म्हणजेच आमच्या लाडक्या अम्मा. अम्मा म्हणजे घरातील आधारवड, सपोर्ट सिस्टम. कोणत्याही प्रसंगी, अडचणीच्या वेळेस मदतीला धावून येणारी करणारी आपल्या आईच जणू! दुपारी मी त्यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. माझ्या आयुष्यातला हा खुप हळवा क्षण असतो.
रात्री नेहमीप्रमाणे शेकोटी, गप्पा आणि हास्यविनोद या मुळे जरा मानसिक ताण कमी झाला. जेष्ठांचे मार्गदर्शन मिळाले, तरुणांची व्हिजन समजली. सकाळी लवकर उठून, स्वतःचे सगळे आवरून, अंघोळ करून, अभय सरांचे वडील ठाकुरदास बंग यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या समाधीच्या जागी थोडा वेळ मेडीटेशन केले आणि OT कडे जायला निघालो परंतु अमीत, वैभव आणि प्रमोद यांनी त्या कडाक्याच्या थंडीत अभ्यासिके जवळच्या तळ्यात पोहण्यासाठी अक्षरशः ओढून नेले.
गार पाण्यात उतरताना भीती वाटतं होतं पण एकदा पाण्यात गेल्यावर पाणीच उबदार आहे हे समजले. तासाभरानंतर आम्ही नाश्ता करून परत OT मध्ये आलो. परत शांत चित्ताने पुढील सर्जरीज पार पडल्या. शेवटची केस संपली आणि शोधग्राम चा निरोप घेण्याची वेळ आली. खरंतर मी राहतो बारामतीमध्ये आणि गडचिरोली माझ्या पासुन जवळपास 1500 किलोमीटर अंतरावर आहे. पण या भागाशी आता एक नाते जोडले गेलेले आहे.
हा भाग नक्षलवाद प्रभावित असला तरी आता त्याची भीती वाटतं नाही. पहिल्या पासूनच वाटली नाही. बर्याचदा काही लोकांनी ट्रकवर हल्ला केला, पोलिस चौकी जाळल्या, सलग अठरा ट्रक एका मागे एक उभे करून पेटवून दिले अशा बातम्या पाहिल्यावर, ऐकल्यावर घरातील लोक घाबरतात इतकेच. पण आता नक्षलवाद विचारसरणीचे लोक हत्यारे खाली ठेऊन मुख्य प्रवाहात सामील होत आहेत.
काही गोष्टी जबाबदारी म्हणुन करायच्या असतात. या अशा आदिवासी व दुर्गम भागातील बांधवांची सेवा करता येते, यासाठी मला माझ्या अनुभवाचा, अभ्यासाचा उपयोग करता येतो हेच माझे पुण्य. हीच माझी सेवा. अगदी 2016 पासून मी या ओढीने त्या भागात जातो. सर्च चा हा कॅम्प मला ऊर्जा देतो,प्रेम देतो. वर्षभर साठलेले मनातील मळभ दूर होते.
पाच सहा दिवस आम्ही एकत्र असतो.विचारांची देवाणघेवाण होते. प्रेम व आशिर्वाद मिळतात. प्रेषितांची भेट होते. निसर्गाची विशालता समजते.आपल्या अडचणी किती छोट्या असतात याचा उलगडा होतो.जीवनाचे सार समजते.मी कधीही न पाहिलेल्या रुग्णांची आपल्या हातून सेवा होते याचे समाधान वाटते.











