विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांनी उभारलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. बारामती एका गणेश मंडळाने तुमच्यासाठी काय पण असा उल्लेख करत अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर झळकावले आहेत.
शरद पवार व अजित पवार यांच्यात राजकीय फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. यामध्ये शरद पवार गटाचा विजय झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. तर शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांची बारामती तालुक्यात स्वाभिमानी यात्रा सुरू आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार लढत होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे बारामती मतदार संघाची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली आहे. बारामती शहरातील अखिल भारतीय तांदुळवाडी वेस या गणपती मंडळाकडून अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर असलेला बॅनर लावण्यात आला आहे.तसेच बॅनरवर तुमच्यासाठी कायपण, माणूस जिवाभावाचा.. असा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीत या बॅनरची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.











