सोलापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यातील आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत असून वेगवेगळ्या समाजाचे नेते आंदोलन, उपोषणासारखे अस्त्र अवलंबित आहेत. आता धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर धनगर समाजाची आंदोलने सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे नेते व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच धनगर समाजाच्या आरक्षणाचा जीआर निघेल असे विधान गोपीचंद पडळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले असून मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासन या निर्णयासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी व काँग्रेसने आतापर्यंत सातत्याने धनगर समाजाची फसवणूक केली असून धनगर व धनगड ही दोन्हीही एकच जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केले असून, पहिल्यांदाच आता धनगरांना न्याय मिळण्याची वेळ आली आहे असे मत पडळकर यांनी व्यक्त केले आहे. आता आम्ही मुंबईतच ठाण मांडून बसणार असून मुख्यमंत्र्यांनी शिंदे समितीला कर्नाटक व गोवा राज्यातून जी माहिती व कागदपत्रे गोळा करावयाचे आहेत, ते करण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे पडळकर यांनी सांगितले.











