नगर : महान्यूज लाईव्ह
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे घडलेल्या हत्याकांडाने सारेच सुन्न झाले आहेत. येथील तीन वर्षाचा चिमुकला बेपत्ता झाला होता. त्याचं अपहरण झालं होतं. पाच दिवसानंतर त्याचा मृतदेह एका शेतात सापडला. याचे गुढ उकलताना पोलिसांनी जे समोर आणले आहे, त्यातून मात्र नातेसंबंधातील माणुसकी संपली की काय अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथून सहा सप्टेंबर रोजी स्नेहदीप त्रिभुवन या तीन वर्षाच्या चिमुकल्याच कोणीतरी अपहरण केलं होतं. तो बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली. दरम्यान नातेवाईकांनी आणि पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आणि ११ सप्टेंबर रोजी एका शेतामध्ये या चिमुकल्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली.
तपासात आढळलं काय? तर बायको नांदायला येत नाही, म्हणून वैजापूर येथील राहुल बोधक यानेच मेव्हण्याचाच तीन वर्षाचा हा चिमुकला पळवून नेला आणि तोंड दाबून त्याचा खून केला. पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून राहुल बोधक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने या खुनाची कबुली दिली. संभाजीनगर रस्त्यावरील गारच येथे एका मक्याच्या शेतात स्नेहदीप चा खून करून मृतदेह टाकला होता.











