छत्रपती संभाजीनगर : महान्यूज लाईव्ह
घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या लिंबे जळगाव गावातील टोलनाका शेजारची. नातेवाईकाला दहा वर्षानंतर मुलगा झाला म्हणून खास पुण्याहून संभाजीनगर कडे आलेल्या अभियंत्याच्या कुटुंबाला दारुड्या पोरांच्या गाडीने धडक दिली आणि यात चौघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दारू पिऊन तर्र झालेल्या दोघाजणांनी स्कॉर्पिओ दुभाजकाला ओलांडून पलीकडे नेऊन अभियंत्याच्या कारला धडकवली आणि यात चौघा जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृणालिनी अजय देसरकर (वय ३८) आशा हरिहर पोपळघट (वय ६५) अमोघ देसरकर (वय सहा महिने) दुर्गा सागर गीते (७ वर्ष) या चौघांचा मृत्यू झाला तर अजय देसरकर व शुभांगीनी सागर गीते हे जखमी झाले.
पोलिसांनी या प्रकरणांमध्ये विशाल चव्हाण व कृष्णा केरे या दोघा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून यातील चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही त्याने गाडी चालवली. तो दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.











