विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार गटाचे युवा नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी स्वाभिमानी यात्रेला आजपासून सुरुवात केली.
या अगोदर युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने बारामती तालुका पिंजून काढला होता. सुप्रिया सुळे विजयी झाल्यानंतर आभार दौराही बारामती तालुक्यामध्ये आयोजित करून मतदारांचे आभार मानले होते. आता युगेंद्र पवार हे बारामती तालुक्यामध्ये स्वाभिमानी यात्रा काढत आहेत. युगेंद्र पवार हे शरद पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.
युगेंद्र पवार हे बारामतीमधील प्रत्येक गावामध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून या स्वाभिमान यात्रेच्या निमित्ताने जाणून घेणार आहेत. शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा आणि आदरणीय पवार साहेबांचा विचार आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश आहे.
यामध्ये मी जनतेशी मुक्त संवाद करणार आहे. पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही, ना यापुढे झुकेल’ या स्वाभिमानी विचाराचा जागर करण्यासाठी, या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्यांचे मनोबल आणखी वाढविण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी मी आपल्या भेटीला येतोय असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.











