विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : अजित पवार गट व शरद पवार गटात राजकीय फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. ही जनसन्मान यात्रा बारामतीमध्ये आली होती. भर पावसात अजित पवारांनी बारामतीत रोड शो केला. तेव्हा अजित पवारांचे शेकडो समर्थक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी या रॅलीत सहभाही झाले होते. रॅलीनंतर बारामतीतल्या मिशन हायस्कूल मैदानावर अजित पवारांची जाहीर सभा झाली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काहीजण म्हणतात, बारामतीत आता वेगळंच वाटतंय, पूर्वी एवढे ‘पवार’ घरी येत नव्हते. आता सगळेच ‘पवार’ विचारपुस करायला लागलेत. गेल्या २५ ते ३० वर्षात कोणी आले नव्हते. काय रे बाबा कसं आहे तुझं? नीट आहे ना, जे पवार केवळ मत मागत होेते. ते घरोघरी दारोदारी फिरायला लागले.
सगळेच पवार हे पण आणि ते पण सगळेच पवार फिरायला लागलेत. हरकतं नाही, तो तुमचा मान आहे. तुम्ही मतदार राजा आहात. तुम्ही ठरवायचं आहे, काय करायचं? तो तुमच अधिकार आहे. त्याच्या खोलात मी जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.











