बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती बाजार समिती मध्ये कांदा व लिंबास उच्चांकी दर मिळाला. 28 ऑगस्ट च्या सुपे उप बाजारातील लिलावात शेतकऱ्यांच्या लिंबाला उच्चांकी 92 रुपये पर्यंत प्रति किलो दर मिळाला. तर जळूची उपबाजारात कांद्याला प्रतिक्विंटल 3450 ते 4600 रुपये असा दर मिळाला.
जवळ आलेले सण आणि पुणे मुंबईची बाजारपेठ यामुळे सध्या वाढलेल्या लिंबाच्या व कांद्याच्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अगदी दहा रुपये किलो पर्यंत पोहोचलेले कांद्याचे दर आता वधारू लागले आहेत. सुपे येथील उप बाजारात बुधवारी म्हणजे 28 ऑगस्ट रोजी जो लिलाव झाला त्यामध्ये लिंबाच्या लिलावाला किमान 65 रुपये व कमाल 92 रुपयापर्यंत दर मिळाला. लिंबु खरेदीसाठी बाहेरील खरेदीदार येत आहेत. परराज्यातील बाजारपेठेत लिंबू व कांद्याची मागणी वाढली असल्याने आणि आवक कमी असल्याने उच्चांकी दर निघत आहेत अशी माहिती सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी दिली.
सुपे उपबाजार येथे दर बुधवारी लिंबु लिलाव होतात. बारामती तालुक्यासह दौंड, पुरंदर या भागातील शेतकरी लिंबू 🍋 विक्रीस घेऊन येत आहेत. लिंबू व कांद्यास स्थानिक बाजारपेठेत किरकोळ विक्रीसाठी आणि परपेठेत ही मागणी वाढत असल्याने आणखी दर वाढतील असे अपेक्षित आहे. परंतु चांगल्या मालास उच्च दर मिळत असल्याने लिंबु व कांदा उत्पादक शेतक-यांनी आपला माल ग्रेडींग व सॉर्टींग करून आणावा, म्हणजे आणखी जादा दर मिळतील. अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.











