उद्या सुप्रिया सुळे दौंडमध्ये! विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचारात प्रकरणात घालणार लक्ष
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बदलापूर मधील घटनेने संपूर्ण राज्यात व देशात चर्चा सुरू असतानाच आता पुणे जिल्ह्यातील दौंड मध्येही असाच एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली असून खासदार सुप्रिया सुळे उद्या दौंड येथे या संदर्भात भेट देणार आहेत.
राज्यामध्ये महिलांच्या अत्याचार प्रकरणात वाढ झाली आहे. असाच एक प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये उघडकीस आलेला आहे. याबाबत घडलेली घटना अशी की, दौंड तालुक्यातील माध्यमिक विद्यालय मध्ये शिक्षकांनी विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस झाली आहे. या घटनेने पुणे जिल्हा हादरून गेला आहे. दौंड तालुक्यातील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष भीमराव वाखारे व शिक्षक बापूराव साहेबराव धुमाळ या दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विद्यालयातील शिक्षकांनी शालेय विद्यार्थिनींना व्हाट्सअप वर अश्लील मेसेज पाठवणे, व्हिडिओ कॉल करून अश्चिल हावभाव करणे, अभ्यास आणि शिकवण्याच्या नावाखाली ब्लॅकमेल करत लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शिक्षकांकडून 8 ते 9 विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जात आहे.
याबाबत पालकांनी संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणी मुख्याध्यापक सुभाष वाखारे व शिक्षक बापूराव धुमाळ यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा व पोस्को चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती मध्ये पत्रकारांची संवाद साधत असताना उद्या त्या प्रकरणांमध्ये लक्ष घालणार असून उद्या मी दौंडला जाणार आहे. असे सांगितले.











