दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड आणि आसपासच्या गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या कुरकुंभ येथील विद्युत उपकेंद्रातील 220 केव्ही रोहित्रांमध्ये तांत्रिक बिघड झाल्याने पुढील पाच दिवस भारनियमन करून विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. ही माहिती महावितरण वीज कंपनीकडून देण्यात आली.

दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात सातत्याने तासन् तास विद्युत पुरवठा खंडित केला जातो. परिणामी विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे घरगुती, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागते. विद्युत उपकरणांमध्ये सातत्याने बिघाड होण्याचे प्रमाण वाढले असून महावितरण कंपनीच्याही वीज कर्मचाऱ्यांची ही एक नवीन डोकेदुखी बनली आहे.

बुधवारी (दि २१) रात्री कुरकुंभ महापारेषणच्या उपकेंद्रातील 50 एम व्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्रातील रोहित्रांमध्ये मोठा बिघाड झाला आहे . त्यामुळे थ्री फेज विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे कमीत कमी पाच दिवस लागतील. 11 केव्ही पाटस गाव फिडर सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सिंगल फेज किंवा थ्री फेज चालू राहील.
उर्वरित वेळेत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी पाटस व वरवंड, केडगाव उपकेंद्राला होणारा वीज पुरवठा विस्कळीत होणार असून वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरण वीज कंपनीकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाटस उपकेंद्रातून निघणाऱ्या वीज वाहिन्यांवर चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे. अशी माहिती महावितरण विद्युत कंपनीकडून देण्यात आली आहे.











