सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली तहसील कार्यालय परिसरात वावरणाऱ्या एजंटकडून सर्वसामान्य नागरीकांची प्रचंड लूट होत आहे, सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करणा-या एजंट वर कारवाई करावी, अशी मागणी इंदापूर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

शिवसेना पुणे जिल्हा महिला प्रमुख सीमा कल्याणकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामचंद्र जामदार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून नागरिकांना रेशनकार्ड न मिळणे, कार्डवर नावात बदल करणे, वेगळे रेशनकार्ड काढणे, यासाठी काही हजारों रुपये ग्रामीण भागातील नागरिकांना मोजावे लागतात. ही होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी तहसीलदार जीवन बनसोडे यांनी तहसील कार्यालयामध्ये वावरणाऱ्या अशा एजंट वर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांना इंदापुरात होत असलेल्या पिळवणुकीबाबत पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. एजंटांवर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा शिवसेना शहराध्यक्ष शुभम जामदार यांनी दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांची जर कोणी एजंट अशी पिळवणूक करत असेल, फसगत होत असेल अशा नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहनही जामदार यांनी केले आहे. यावेळी उपजिल्हा समन्वयक विशाल धुमाळ, महिला शहरप्रमुख राधिका जगताप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.











