राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार पाटस येथील शिवस्वराज यात्रेच्या कार्यक्रमात उघड झाला. दरम्यान, याबाबत खासदार सुळे यांनी स्वतःच ट्विट करत या माहिती दुजोरा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा दौंड तालुक्यातील पाटस येथे काल रविवारी (दि.११) आली होती. या कार्यक्रमासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमावेळी खासदार सुप्रिया सुळे या मोबाईल बघत असताना त्यांना हा प्रकार लक्षात आला.
त्यांनी त्वरित जयंत पाटील आणि आप्पासाहेब पवार यांची चर्चा केली आणि त्वरित तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना बोलावून घेतले. त्यांना याबाबत कल्पना दिली. हा काय प्रकार आहे याबाबत त्यांनी चौकशी करण्याची सूचना केली. आपला मोबाईल आणि व्हाट्सअप झाल्याचे लक्षात येताच खासदार सुळे यांनी सिमकार्ड काढले असून पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
दरम्यान, अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही खातीही हॅक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून अशा प्रकारची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.











