राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यात रस्त्यावर पडलेले खड्डे हे सध्या वाहन चालक आणि प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. या जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नांकडे दौंड तालुक्याचे आजी- माजी लोकप्रतिनिधी सोईस्करपणे डोळेझाक करीत आहेत का? का हे खड्डे त्यांना दिसून येत नाही? या खड्ड्यांच्या प्रश्नांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ते का विचारणा करीत नाहीत ? रस्त्यावर अपघात होऊन आणखी किती जीव जाण्याची वाट हे पाहत आहेत. ? असे अनेक प्रश्न आता तालुक्यातील वाहन चालक व प्रवासी उपस्थित करू लागले आहेत.
दौंड तालुक्यातून गेलेल्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्याच्या बोरीभडक ते स्वामी चिंचोली पर्यंत रस्त्याच्या हद्दीत दोन्ही बाजूला मुख्य रस्ता ते सेवा रस्त्यांवर ठीक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केंद्रीय रस्ते प्रशासन विभाग आणि पाटस टोलनाका प्रशासन विभाग केवळ तात्पुरते खड्डे बुजवत आहेत.
हे बुजवलेले खड्डे दुसऱ्या दिवशीच उखडले जात आहेत. असे निकृष्ट दर्जाचे काम संबंधित विभागाकडून होत असल्याचे चित्र रस्त्यावरील खड्ड्यांवरुन पाहायला मिळत आहे. तशीच परिस्थिती केडगाव ते चौफुला या रस्त्याची झाली आहे. मागील काही महिन्यांपासून नगर ते सातारा या राज्य मार्गाचे काम सुरू झाले होते. मात्र संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कामांमुळे आणि दिरंगाईमुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक प्रवासी, वाहनचालक तसेच इतर वाहनचालक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित ठेकेदारांनी या रस्त्याचे काम पावसाच्या तोंडावर सुरू केले, ते पावसाळ्यापूर्वी पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सध्या या रस्त्यावर पावसामुळे रस्ता चिखलमय होत असून खड्ड्यांमध्ये पाणी साचले जात आहे. त्याचा मोठा त्रास या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि वाहन चालकांना होतो. तशीच परिस्थिती ग्रामीण भागातील गावा गावातील जोडणाऱ्या अनेक अंतर्गत रस्त्यांची पाहायला मिळत आहे.
पावसाळ्यात रस्त्यांची काम बंद असतात, ते करता येत नाही हे जरी खरे असले, तरीही त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यात काम करता येत नाही, हेच उत्तर ऐकायला मिळते. मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरुनच त्या रस्त्याच्या झालेल्या कामाचा दर्जा दिसून येतो. ठेकेदार आणि अधिकारी यांची आर्थिक टक्केवारी हे याचे एक मूळ कारण आहे. शासन लाखो – कोट्यावधी रुपये रस्त्यांच्या नवीन रस्त्यासाठी आणि दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध करून देते, मात्र कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्यांवर खड्डेच पाहायला मिळतात.
अनेक ठेकेदार हे राजकीय नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. अथवा कदाचित पुढाऱ्यांची त्या कामात भागीदारी असू शकते, त्यामुळे पाठीशी घालण्याची देखील काम होत असावे, मात्र सध्या दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, केडगाव चौफुला रस्ता तसेच इतर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे मात्र तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
या खड्ड्यांमुळे छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. दरम्यान, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमध्ये दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झाडे लावून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र तरीही या प्रश्नांकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.











