राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : भाजपमधील महायुतीत सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असतानाच आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने आता दौंड भाजपा आमदार राहुल कुल यांचे आगामी विधानसभेत काम करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
अशा आशयाचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना दिले आहे. ही माहिती संघटनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सरफराज शेख यांनी दिली. दौंड विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजप उमेदवार राहुल कुल यांचे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआय, रासप आणि रयत क्रांती संघटनेने काम केल्याने ते विजयी झाले.
मात्र आता महायुतीतील घटक पक्षांनी आमदार कुल यांना घरचा आहेर दिला आहे. आगामी सन २०२४-२९ च्या विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटना ही आमदार कुल यांचे काम करणार नाही. असा निर्णय नुकताच रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
गेली ५ वर्ष मित्र पक्ष म्हणून आमदार राहुल कुल यांनी रयत क्रांती संघटनेच्या तालुक्यातील कुठल्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतलेले नाही. कधी मित्र पक्षाची बैठक बोलावली नाही. मित्र पक्ष म्हणून कुठलेही काम केलेले नाही. असा आरोप या बैठकीत करण्यात आला. दौंड तालुक्यात झालेला निर्णय रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पत्राद्वारे कळवण्यात आला आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे तसेच भाजपचे प्रमुख नेत्यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. ही माहिती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेख यांनी दिली.











