बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात पक्षात, विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आज अजित पवार यांनी मागितले. दरम्यान 15 ऑगस्ट पूर्वी बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती केली जाणार असून, निष्ठावंतांना प्राधान्य देणार असल्याचे अजित पवारांनी आज जाहीर केले.
आपल्याच स्टेजवर बसायचे आणि आपला कार्यक्रम ठरवायचा. कितीतरी जणांनी सांगितले की, दादा तुमचा म्हणवला जाणारा कार्यकर्ता प्रत्यक्षात तुमचा नाही. एवढे दिले आणि काम मात्र चुकीचे करायचे. अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत. पाहायला मिळालेले आहेत. सुदैवाने मी जरा अधिकारवाणीने बोलतोय, कारण माझी काटेवाडी थोडीशी प्लस मध्ये गेली. म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे.
बोरकरवाडी गावातून बाबुर्डी येथे गेल्यानंतर तेथील पदाधिकाऱ्यांशी बोललो. इतरांशीही बोललो. तेव्हा अनेक गोष्टी आम्हाला कळाल्या. त्यामुळे आता यामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. इथे बसणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन करावे. मनन करावे. आपण प्रतिनिधित्व करत असताना आपण स्वतःच्या बूथवर जिथे मतदारयादीत नाव आहे, तो बुथ आपल्या घड्याळाला प्लस मध्ये आला का नाही? त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करायच्या आहेत. असे अजित पवार म्हणाले
तुम्हाला वाटले असेल, निवडणुकीमुळे मी नाराज झालो. पण निवडणूक म्हणजे यश अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असे वाटते की, यशामुळे हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचायचे नाही. विजेच्या बिलमाफीचा जीआर पाच वर्षासाठी लवकरच काढणार आहे. शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागते. त्यासाठीच हा जीआर काढणार असल्याचे पवार यांनी सांगितले.











