विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बारामतीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
बऱ्याच दिवस पदाधिकारी बदलणार अशी चर्चा होती. अखेर अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये तालुका आणि ग्रामीणचे पदाधिकारी यांचे राजीनामे देण्यास सांगितले. १५ ऑगस्ट पर्यंत नवीन पदाधिकारी नेमणार असल्याचे सांगितले. उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
पवार म्हणाले, मला कुणाचा अपमान करायचा नाही. पण राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांशी व महिला काही स्थानिक कार्यकर्ते उर्मटपणे वागतात. काहीजण तुसड्यासारखं वागतात. त्यांना जर अशा पद्धतीने वागायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणीं येऊ नये. अशा प्रकारची वागणूक देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. याची कृपया नोंद घ्यावी. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी देखील त्याचा मूड येईपर्यंत घरातच बसावं. घरात कायतरी होत आणि तो राग दुसऱ्यावर काढतो. मी त्याची पक्षातून हकालपट्टी करेल. मला कुणाचा अपमान करायचा नाही. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांसमोर काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. महिलांशी बोलताना काळजी घ्यावी असं सांगितलं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याशी दोन कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केले होते. हे पदाधिकारी समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाच धमकावण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्याची गंभीर दखल दादांनी या निमित्ताने घेतली.
दरम्यान अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील घटनांवरून भाष्य केले. ते म्हणाले, काहीजणांनी तर मडकेच फोडले. ते तर मी टिव्हीतच पाहिलं. आता मी सांगेन का, की मडके फोड बाबा म्हणून. पण आता परत जर अस काही झालं, तर तिकडून सुपारी घेऊन आलाय अस मी समजणार. कृपया वजाबाकी करू नका. असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.











