राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरण्यात आलेल्या अर्जापैकी तब्बल 26 हजार 923 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. फक्त 79 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर इतर अर्जांची तपासणी सुरू असून लवकरच ते काम पूर्ण होईल अशी माहिती दौंड पंचायत समितीचे प्रकल्प विकास अधिकारी अभिमान माने यांनी दिली.
राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ग्रामीण भागात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दौंड तालुक्यात आतापर्यंत 52 हजार अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने दाखल झाले आहेत. या अर्जांपैकी 28 हजार अर्जांची छाननी आणि तपासणी करून 26 हजार 923 अर्ज आतापर्यंत मंजूर करण्यात आले आहे.
1 हजार 78 अर्ज हे डिस अपलोड म्हणजेच तात्पुरते अपात्र ठरवण्यात आले असून त्यांनी एडिट करून पुन्हा अर्ज अपलोड करण्याची संधी आहे. डिस अपलोड केलेल्या अर्जाच्या लाभार्थ्यांनी त्वरित ते अर्ज पुन्हा अपलोड करावेत. 79 अर्ज हे नामंजूर करण्यात आले आहेत. तर 28 हजार 500 अर्जामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
या अर्जांची छाननी आणि तपासणी सुरू आहे. 3 ऑगस्टपर्यंत 26 हजार 923 अर्ज मंजूर झाले आहेत. उर्वरित अर्ज ही लवकरच तपासणी करण्याचे काम दौंड पंचायत समितीत युद्ध पातळी सुरू आहे. त्यासाठी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम काम करीत आहे. ज्या लाभार्थी महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले नाहीत. अशांनी 31 ऑगस्ट पूर्वी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत असे आवाहन दौंड पंचायत समिती प्रकल्प अधिकारी अभिमान माने यांनी केले आहे.











