मुंबई : महान्यूज लाईव्ह
बहुमताच्या जोरावर केंद्र शासनाने कृषी विधेयकाला मंजूरी घेतली. मात्र आता या विधेयकाला विरोध वाढत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून कृषी विधेयकाला विरोध केल्यामुळे निलंबित केलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकांना राज्यसभेतील विरोधी सदस्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. घोषणाबाजी करीत या विधेयकावर चर्चा घेण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र ही मागणी फेटाळत विरोध करणाऱ्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे आता कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भुमिका घेतली आहे.
याबाबत आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत खा. शरद पवार यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट करीत निलंबित खासदारांच्या समर्थनार्थ आपणही एक दिवसाचा अन्नत्याग करत असल्याचे जाहिर केले आहे. या विधेयकाबाबत चर्चा होणे आवश्यक असतानाही हे विधेयक मंजुर करुन घेण्याची घाई सरकारने केली. त्यातून सरकारची हे विधेयक रेटून नेण्याची मानसिकता उघडपणे दिसत असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले.
सत्ताधारी पक्षाने चुकीच्या पद्धतीने हे विधेयक मंजूरीसाठी ठेवले. त्यामुळे राज्यसभेतील खासदारांनी संसदीय नियमांकडे उपसभापतींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
..तर अधिवेशनाच्या उर्वरीत कामकाजावर बहिष्कार
दरम्यान, निलंबित खासदारांनी संसदेच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे संबंधित खासदारांचे निलंबन मागे न घेतल्यास पुढील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.










