बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीचे उद्योजक व बारामतीच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर चे अध्यक्ष शरद सूर्यवंशी यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्मेंट को-ऑर्डिनेशन म्हणजेच शासकीय सल्लागार समितीच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघटनेच्या गव्हर्निंग कौन्सिल मध्ये पदसिद्ध सदस्य म्हणूनही निवड करण्यात आली आहे.
हा बारामतीचा उद्योग जगतात बहुमान समजला जात असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर ही राज्याच्या व्यापार, उद्योग, कृषी उद्योग व सेवा क्षेत्रातील शिखर संस्था आहे.
या संस्थेची कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच नाशिक येथे पार पडली. शतक महोत्सवी संस्थेच्या या कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण अशा तज्ञ विषय समित्यांपैकी गव्हर्मेंट को-ऑर्डिनेशन ही समिती असते. या समितीच्या चेअरमन पदी शरद सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी दिलीप गुप्ता व प्रफुल्ल मालाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीच्या निमित्ताने बारामतीसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योजकांचे प्रश्न महाराष्ट्रातील शिखर संस्थेच्या व्यासपीठावर अधिक प्रभावीपणे मांडता येतील आणि त्याचा पाठपुरावा करता येईल यासाठी व्यापक पाठिंबा देखील निर्माण होईल असा आशावाद शरद सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. सूर्यवंशी यांच्या या निवडीबद्दल बारामतीच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर या संस्थेच्या कार्यकारणीतील सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.











