विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर येथे २२ जुलै २०२४ रोजी ‘टेक्नोथॉन सोमेश्वर 2K24 ‘या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल चिंचोलीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘गवतापासून बनवलेला सेंद्रिय कागद ‘या प्रकल्पास ४०० प्रकल्पांमधून प्रथम पारितोषिक मिळाले.
हा प्रकल्प पूर्वा देवकाते,आदिती दुबे,राजेश्वरी कुताळ व अनुष्का वाघ या विद्यार्थिनींनी विज्ञान शिक्षिका राधिका प्रक्टूर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला होता. या स्पर्धेतील प्राप्त पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह असे आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सचिव ॲड. नीलिमा गुजर, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, विश्वस्त डॉ. राजीव शहा, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्री. श्रीष कंबोज व शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे यांनी अभिनंदन केले.











