भिगवण : महान्यूज लाईव्ह
मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस ओलंपियाड स्पर्धेत भिगवण येथील गडकर सुपरफास्ट अबॅकस संस्थेची विद्यार्थिनी आद्या अजय थोरात हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला.मुंबईत झालेल्या या आंतरराष्ट्रीय अबॅकस ओलंपियाड स्पर्धेत 29 देशातील 550 निवडक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ही स्पर्धा उच्चतम काठिण्य पातळीची मानली जाते. या स्पर्धेत भिगवणची आद्या चमकली. आद्या ही भिगवण येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. प्राची अजय थोरात व भिगवण येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. अजय थोरात यांची कन्या आहे. ती सध्या बारामती तालुक्यातील पिंपरी येथील विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर शाळेत इयत्ता सातवीत शिकते.
अलीकडच्या काळात गणित हा महत्त्वाचा विषय बनला आहे आणि हेच गणित सोपं करण्याचं काम करतं अबॅकस! आंतरराष्ट्रीय अबॅकस ओलंपियाड मुंबईमध्ये नुकतीच पार पडली या ओलंपियाड मध्ये 29 देशातील साडेपाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने इंदापूर तालुक्याचा नावलौकिक वाढला असून, भिगवण च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आद्या हिला स्नेहल गडकर व शैलेंद्र गडकर यांनी मार्गदर्शन केले.











