वाई तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील जोर येथील शेतकरी श्री. विलास आनंदा जाधव यांनी नाचणी राज्यस्तरीय पीक स्पर्धेत फटकावला राज्यात द्वितीय क्रमांक
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : कृषी विभागाने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पीक स्पर्धेत वाई तालुक्यातील दुर्गम मानल्या जाणाऱ्या जोर गावातील शेतकरी विलास आनंदा जाधव यांनी नाचणीच्या पिकामध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. हेक्टरी 70.34 क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन घेत त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळवला.
महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागामध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्याचा गौरव करून त्याचे मनोबल वाढविण्यास मदत होऊन अधिक उमदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्याचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यात तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर कृषि विभागामार्फत दरवर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पिक स्पर्धा योजना राबविण्यात येते. सन २०२३-२४ खरीप हंगामामध्ये तालुका कृषि अधिकारी वाई यांच्यामार्फत सोयाबीन, भात, नाचणी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये तालुक्यातील ५३ शेतकरी सहभागी झाले होते. सदरच्या पिक स्पर्धेत कृषि विज्ञान केंद्र बोरगाव व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पिक कापणी प्रयोग आयोजित करून त्यानुसार सोयाबीन, भात, नाचणी पिकांच्या उत्पादनाची नोंद घेण्यात आले.
त्यामध्ये वाई तालुक्यातील जोर येथील शेतकरी विलास आनंदा जाधव यांनी नाचणी पिकाचे विक्रमी हेक्टरी ७०.४० क्विंटल इतके उत्पादन घेऊन राज्यात द्वितीय क्रमांक फटकावला आहे.
राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे ४० हजार रुपये बक्षिस कृषी आयुक्तांनी घोषित केलेले आहे. यामुळे वाई तालुक्याची ओळख राज्यस्तरावर झाली आहे. या विक्रमी उत्पादनासाठी त्यांना वाई विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, मंडळ कृषी अधिकारी विजय गायकवाड, कृषी पर्यवेक्षक श्रीमती रेवती जाधव, कृषी सहाय्यक सोनू शेळके यांनी नाचणी पिकाचे मार्गदर्शन केले आहे.
वाई तालुक्यातील अतिशय दुर्गम असे जोर खोरे आहे. भात व नाचणी पिकांचे उत्पादन घेतले जाते श्री.विलास आनंदा जाधव यांनी राज्यस्तरीय नाचणी पिक स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक फटकावून तालुक्याचा नावलौकिक वाढविले आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक श्री.प्रशांत शेंडे उपविभागीय कृषि अधिकारी वाई











